कसोटी आणि वन-डे मालिकेपाठोपाठ भारताने टी-२० मालिकेतही आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. लोकेश राहुल, मनिष पांडे आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या फटकेबाजीमुळे भारताने श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १०० धावांच्या आत माघारी परतला. भारतीय संघाने कटकचा सामना ९३ धावांनी जिंकत टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्मासाठी टी-२० सामन्यातला कर्णधार म्हणून हा पहिला विजय ठरला आहे.

कटकच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात काल तब्बल ८ विक्रमांची नोंद करण्यात आली.

० – टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून आतापर्यंत महेंद्रसिंह धोनी आणि कुमार संगकारा यांनी सर्वाधिक झेल घेतले आहेत. दोनही खेळाडूंच्या नावावर आतापर्यंत १३३ झेल जमा आहेत. संगकाराने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेतली असल्याने धोनी आगामी काळात हा विक्रम आपल्या नावावर करेल यात काही शंका नाही.

१ – टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधीक बळी घेण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सच्या नावे होता. धोनीच्या नावावर ७४ बळींची नोंद आहे तर डिव्हीलियर्सच्या नावावर ७३ बळींची नोंद आहे.

१ – कटकच्या मैदानात श्रीलंकेवर ९३ धावांनी मिळवलेला विजय हा भारताचा टी-२० क्रिकेटमधला सर्वात मोठा विजय ठरला आहे.

२ – कटकच्या मैदानावर भारताचा हा दुसरा टी-२० सामना ठरला. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने या मैदानावर पहिला सामना खेळला होता, ज्यात भारताचा संघ ९२ धावांवर सर्वबाद झाला होता.

२ – पाकिस्तानच्या कामरान अकमलनंतर टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून एकूण २०० बळी घेणारा महेंद्रसिंह धोनी हा दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे.

४ – श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावणारा लोकेश राहुल हा चौथा भारतीय फलंदाज ठरला. याआधी गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि शिखर धवन यांनी लंकेविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे.

१० – अँजलो मॅथ्यूजने रोहित शर्माला बाद करण्याची ही दहावी वेळ ठरली. एखाद्या गोलंदाजाने एका फलंदाजाला सर्वाधिकवेळा बाद करणाऱ्यांच्या यादीत मॅथ्यूज-शर्मा जोडी पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित व्यतिरीक्त इंग्लंडच्या ग्रॅम स्वॅन आणि जेम्स अँडरसन या गोलंदाजांनी विराट कोहलीला ८ वेळा बाद केलं आहे.

१८ – युझवेंद्र चहल २०१७ या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत चहलच्या खात्यात १८ बळी जमा आहेत.

Story img Loader