वनडे मालिका खिशात टाकल्यानंतर धवनसेनेने टी-२० मालिकेची सुरुवातही दणक्यात केली. कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ३८ धावांनी पराभूत केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेची घसरगुंडी उडाली. नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने आपला दमदार फॉर्म कायम राखत अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात श्रीलंका २० षटकात १२६ धावांवर ढेपाळली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ बळी घेतले. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेचा डाव
भारताच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांनी ५० धावांत अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका आणि धनंजय डि सिल्वाला गमावले. अविष्का चांगल्या लयीत खेळत होता. पण भुवनेश्वरने त्याचा काटा काढला. अविष्काने ३ चौकारांसह ६ धावा केल्या. मधल्या फळीत चरिथ असालांकाने थोडा प्रतिकार केला, पण दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. असालांकाने २६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावा केल्या. असालांका बाद झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी तिखट मारा केला. या माऱ्यापुढे लंकेचे शेपटाकडील फलंदाज निष्प्रभ ठरले. श्रीलंकेला २० षटकात सर्वबाद १२६ धावाच करता आल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३३ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. दीपक चहरला २ बळी घेता आले.
1st T20I. It’s all over! India won by 38 runs https://t.co/RErEZ13XD9 #SLvIND
— BCCI (@BCCI) July 25, 2021
भारताचा डाव
पदार्पणाची संधी मिळालेला पृथ्वी शॉ आणि कर्णधार शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. मात्र पहिलाच चेंडू घातक ठरला. लंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीराने पृथ्वीला यष्टीपाठी झेलबाद केले. पृथ्वी बाद झाल्यावर संजू सॅमसन मैदानात आला. त्याने धवनसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. टीम इंडियाचे अर्धशतक झाल्यानंतर वनिदू हसरंगाने सॅमसनला पायचित पकडले. सॅमसनने २७ धावांची खेळी केली. सॅमसनची जागा सूर्यकुमार यादवने घेतली. धवन-सूर्यकुमारने टीम इंडियाचे शतक फलकावर लावले. या दोघांनी ३६ चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १४व्या षटकात भारताचा कर्णधार झेलबाद झाला. धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमारने अफलातून अर्धशतक ठोकले. १६व्या षटकात सूर्यकुमार हसरंगाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली.
सूर्यकुमारनंतर आलेला हार्दिक पंड्या पुन्हा एकदा अपयशी ठरला. पंड्याने १२ चेंडूत १० धावा केल्या. शेवटच्या षटकांत इशान किशनने फटकेबाजी केल्यामुळे भारताला दीडशेचा पल्ला गाठता आला. इशानने २० धावा केल्या. लंकेकडून हसरंगा आणि चमीरा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.