वेस्ट इंडिजचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही देशांदरम्यान आजपासून गाले येथे मालिकेतील पहिली कसोटी सुरू झाला. मात्र पहिल्याच दिवशी मैदानावर मोठी घटना घडली. वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणाऱ्या जेरेमी सोलोझानोला फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. यानंतर त्याला स्ट्रेचरवर मैदानातून बाहेर नेण्यात आले. ही घटना सामन्याच्या २४ व्या षटकात घडली.
हे षटक वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज रॉस्टन चेसने टाकले. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने स्ट्राइकवर होता. चेसच्या षटकातील चौथा चेंडू थोडा आखुड टप्प्याचा होता. यावर दिमुथने जोरदार पुल शॉट मारला. फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सोलोझानोच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. करुणारत्नेने इतका जोरदार पुल शॉट खेळला की सोलोझानोच्या हेल्मेटचा मागचा भाग निघून तो जमिनीवर पडला.
हेही वाचा – IND vs NZ : ‘‘टीम इंडियाचा कॅप्टन बदला…”, काँग्रेस नेते शशी थरूर यांची मागणी; रोहित, राहुल नको, तर…
सोलोझानो जमिनीवर पडताच फिजिओ धावतच मैदानावर पोहोचले. त्याचे डोके टॉवेलने झालके होते. त्यावेळी संपूर्ण वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि श्रीलंकेच्या फलंदाजांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. आपल्या खेळाडूंना दुखापत झाल्याचे पाहून प्रशिक्षक फिल सिमन्स यांनीही लगेचच ड्रेसिंग रूममधून मैदान गाठले. मात्र, फिजिओच्या उपचारानंतरही सोलोझानोच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार करुणारत्ने आणि पथुम निशांक यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके पूर्ण केली. पहिल्या विकेटसाठी या दोन फलंदाजांमध्ये शतकी भागीदारी झाली.