भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांना करोनाची लागण झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली. आरटी-पीसीआर चाचणीत फ्लॉवर पॉझिटिव्ह आढळले. १३ जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होईल.

“करोनाची लक्षणे आढळल्यानंतर फ्लॉवर यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांना लगेचच इंग्लंडहून परतलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांपासून वेगळे ठेवण्यात आले, जे सध्या क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहेत,” असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले.

 

कोलंबोत रंगणार सामने

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर दोन्ही संघ २१, २३ आणि २५ जुलै रोजी टी-२० सामने खेळतील. सर्व सामने कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियमवर होतील. श्रीलंकेविरूद्ध सर्वाधिक वनडे खेळण्याच्या बाबतीत टीम इंडिया अव्वल आहे. भारताने लंकेविरुद्ध १५९ सामने तर पाकिस्तान ११५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत कोणताही संघ १०० एकदिवसीय सामने खेळू शकलेला नाही.

एकदिवसीय इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानने श्रीलंकेला ९२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. यानंतर टीम इंडिया ९१ विजयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानला हरवण्याची संधी आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने ६१ विजय मिळवले आहेत.

हेही वाचा – विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : बार्टी, प्लिस्कोव्हा अंतिम फेरीत

श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, राहुल चहर, के गौतम, कुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.