भारतीय खुली बॅडमिंटन जिंकणारा किदम्बी श्रीकांत हा विविध फटक्यांची शैली लाभलेला लढवय्या खेळाडू आहे. मात्र त्याने देशाचा नावलौकिक उंचावण्यासाठी मानसिक कणखरता आणली पाहिजे, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.
श्रीकांतने रविवारी भारतीय खुल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत व्हिक्टर अॅक्सेलसन याच्यावर १८-२१, २१-१३, २१-१२ अशी मात केली. त्याने मिळविलेल्या विजेतेपदाचे कौतुक करताना गोपीचंद म्हणाले, ‘‘सातत्यपूर्ण कामगिरी हेच त्याच्या यशाचे गमक आहे. जेव्हा तुम्ही अनेक स्पर्धा जिंकत असता, त्या वेळी तुमची कामगिरी मुलखावेगळी होत असते. काही खेळाडूंच्या कामगिरीत चढउतार खूप असतात. श्रीकांतच्या कामगिरीत सातत्य आहे. त्याच्याकडे शेवटच्या गुणापर्यंत झुंज देण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे फटक्यांची विविधता आहे. त्याचा फायदा त्याला सामन्यास कलाटणी देण्यासाठी होतो. मानसिक कणखरता व शारीरिक तंदुरुस्ती यावर त्याने आता अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.’’
श्रीकांतच्या खेळाविषयी गोपीचंद यांनी पुढे सांगितले, ‘‘स्मॅशचे जोरकस फटके, नेटजवळून प्लेसिंग व कॉर्नरजवळ फटके मारणे ही त्याच्या खेळाची खासियत आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकित करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, मात्र त्याने खेळातील विविधता वाढविण्यावर भर दिला पाहिजे. त्याला उज्ज्वल भवितव्य लाभले आहे. एच. एस. प्रणॉय, आर. एम. व्ही. गुरुसाईदत्त, अजय जयराम यांच्याकडेही अव्वल यश मिळविण्याची क्षमता आहे. त्यांनी अनेक आश्चर्यजनक विजय नोंदविले आहेत. मात्र सातत्यपूर्ण यश मिळविण्यासाठी त्यांनी सरावावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.’’
सायना नेहवालच्या विजेतेपदाबद्दल गोपीचंद म्हणाले, ‘‘सायना व श्रीकांत यांनी एकाच वेळी भारतीय खुली स्पर्धा जिंकून देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिले आहे. सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेत इतिहास घडविला आहे. तिचे हे यश गगनभरारी घेणारे आहे. केवळ बॅडिमटन नव्हे तर देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी हे यश भूषणावह व प्रोत्साहनदायी आहे. गेले काही दिवस भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.’’
‘‘भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत आपल्या तीन खेळाडूंनी उपांत्य फेरीत मजल गाठली होती, ही खूपच प्रेरणादायक कामगिरी आहे. जर सहयोगी प्रशिक्षकवर्ग चांगला मिळाला तर भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवू शकतील. प्रशिक्षक म्हणून मी जेव्हा सूत्रे हाती घेतली, तेव्हा भारताचा एकही खेळाडू पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये नव्हता. सध्या सायना, पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, कश्यप, प्रणॉय या खेळाडूंनी पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. ,’’ असे ते पुढे म्हणाले.
‘‘आपल्या देशात अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांची कमतरता आहे. अनेक खेळाडूंना वैयक्तिक मार्गदर्शन मिळाले तर हे खेळाडू सर्वोत्तम यशाकडे झेप घेतील. किरण कुमार यांनी फिजिओ म्हणून खूप अथक परिश्रम घेतले आहेत. ,’’ असेही गोपीचंद यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा