गेल्या रविवारी सिंगापूर शहरात आयोजित सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत अनोखं दृश्य अनुभवायला मिळालं. पुरुष गटात जेतेपदासाठी दोन भारतीय खेळाडू एकमेकांसमोर होते. सुपर सीरिज म्हणजे बॅडमिंटन विश्वातली सर्वोच्च श्रेणीची स्पर्धा. या स्पर्धासाठी पात्र ठरणंही अवघड असतं. मात्र बॅडमिंटनपटू घडवणाऱ्या फॅक्टरीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या अथक प्रयत्नांचं हे फलित होतं. तिसऱ्या गेममध्ये किदम्बी श्रीकांतने लगावलेला फटका स्वैर गेला आणि कोर्टच्या दुसऱ्या बाजूला त्याचा मित्र बी. साईप्रणीतने लोळण घेतली. कारकीर्दीतलं पहिलंवहिलं सुपर सीरिज जेतेपद मिळवल्यानंतरही साईप्रणीतच्या जल्लोषात आक्रस्ताळेपणा नव्हता. विजयी उन्माद नव्हता. जेतेपदाचं अप्रूप त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांत दिसत होतं, पण हे स्वप्न साकारण्यासाठी एक तपाहून अधिक काळ केलेल्या तपश्चर्येची जाणीव उराशी होती.

भारतीय संघातील सहकारी तसेच समर्थकांनी साईप्रणीतला तिरंगा दिला. मात्र प्रतिस्पर्धी जिवाभावाचा मित्रच आहे, हे लक्षात असलेल्या साईप्रणीतने आणखी एक तिरंगा श्रीकांतसाठी मागून घेतला. देशासाठी पदक जिंकून दिल्यानंतरही पाय जमिनीवर असल्याचं हे द्योतक. पदक वितरणाचा क्षण आला. लखलखतं सुवर्णपदक साईप्रणीतच्या गळ्यात विराजमान झालं. कारकीर्दीत आतापर्यंत हुकलेल्या असंख्य संधीप्रती कृतज्ञ राहिल्यानेच सुवर्णपदकाचा मानकरी झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची शांतता होती. साईप्रणीतचं हे यश एक मोठ्ठं वर्तुळ सांधणारं आहे. प्रतिभावान खेळाडू म्हणून अनेकांची नोंद होते, मात्र यशोशिखर गाठणारे एका हाताच्या बोटावर मोजणारे असतात. सायना, सिंधू, श्रीकांत यांच्यानंतर सुपर सीरिज स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा साईप्रणीत केवळ चौथा भारतीय खेळाडू आहे. यावरूनच त्याच्या यशामागची खडतरता अधोरेखित होते.

२०१०मध्ये मेक्सिकोत झालेल्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत साईप्रणीतने डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलेनला नमवत कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक स्तरावर स्वत:ची छाप उमटवणारे बहुतांशी खेळाडू पहिल्यांदा याच व्यासपीठावर चमकतात. व्हिक्टर अॅक्सलेन आता जागतिक क्रमवारीत तृतीय स्थानी आहे. देशाची फुलराणी ही बिरुदावली पटकावणाऱ्या सायनानेही २००६ आणि २००८ मध्ये याच स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली होती. सायनाची विजयगाथा सर्वश्रुत आहे. साईप्रणीतची वाटचाल मात्र मनाजोगती झाली नाही.

२०१३मध्ये साईप्रणीतने इंडोनेशिया स्पर्धेत माजी ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या तौफिक हिदायतला त्याच्याच घरच्या मैदानावर हरवण्याची किमया केली. आधुनिक बॅडमिंटनमधल्या दिग्गजांमध्ये तौफिकचं नाव घेतलं जातं. हा विजय साईप्रणीतच्या कारकीर्दीत निर्णायक ठरणार अशी चिन्हे असतानाच स्पर्धेतल्या पुढच्या लढतीत त्यानं गाशा गुंडाळला. वर्ष सरत गेली. २०१६मध्ये म्हणजे गेल्या वर्षी साईप्रणीतने बॅडमिंटन विश्वाचा मानबिंदू असलेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेत ली चोंग वेईला चीतपट केलं. जिंकण्याच्या यांत्रिक घोटीव सातत्यासाठी ली ओळखला जातो. स्प्रिंगप्रमाणे लवचिकता असणाऱ्या ली याला हरवणं अवघड समजलं जातं, पण साईप्रणीतनं ते करून दाखवलं. या विजयानं तरी त्याच्या कारकीर्दीला आवश्यक गती मिळेल अशी आशा निर्माण झाली. मात्र पुढच्याच सामन्यात त्याचं आव्हान संपुष्टात आलं.

साईप्रणीतची कारकीर्द आशानिराशेच्या हिंदोळ्यावर झुलती राहिली. निसर्गानं दिलेलं उंचीचं वरदान, काटक शरीरयष्टी, कौशल्याची परीक्षा पाहणारे फटके लीलया मारण्याची हातोटी या गुणवैशिष्टय़ांमुळे गोपीचंद यांनी २००५मध्येच साईप्रणीतला हेरलं होतं. साईप्रणीतचं घर दूर असल्यानं आईवडिलांनी त्याला आजीआजोबांकडे ठेवलं. दररोज पहाटे चार वाजता उठून बसचा अर्धा तासाचा प्रवास करून साईप्रणीत अकादमीत पोहचत असे. ९ वाजता त्याचे आजोबा त्याला शाळेसाठी घेऊन जात. संध्याकाळी पुन्हा अकादमीत सरावासाठी सोडत. आणि थोडय़ा वेळाने लहानगा साई घरी परतत असे. घरच्यांच्या विश्वासाला सार्थ ठरत साईप्रणीतने १०, १३, १६ वर्षांखालील आणि कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धाची एकेरी आणि दुहेरीची जेतेपदं नावावर केली होती. उज्वल भविष्य असणाऱ्या अकादमीतल्या गुणी खेळाडूंमध्ये त्याची गणना होत असे. मात्र तो उगवता तारा कोशातच राहिला. साईचे समकालीन सायना, पारुपल्ली कश्यप यांनी एक पाऊल पुढे टाकत सरशी साधली. दुहेरीतून एकेरीत संक्रमण केलेला श्रीकांत आणि वयाने लहान असूनही ऑलिम्पिक पदकाची भरारी घेणारी सिंधू यांच्या वाटचालीत साईप्रणीत दुसऱ्या फळीत फेकला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष गटात संख्या आणि स्पर्धा प्रचंड असते. बहुतांशी स्पर्धामध्ये पात्रता फेरीचा अडथळा पार करण्यातच ऊर्जा खर्च होते. मुख्य फेरीत मातब्बर प्रतिस्पर्धी समोर आल्यावर आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता जास्त. दडपणाच्या क्षणी खेळ उंचावण्यात कमी पडणाऱ्या साईप्रणीतला दुखापतींनी अक्षरक्ष: वेढा दिला. खांदा, पाय, पोटऱ्या दुखापती यामुळे ऐनभरात असणाऱ्या साईप्रणीतचे आव्हान कमकुवत होत असे. मनगटी कलात्मक खेळ करण्याची क्षमता आणि कोर्टच्या विविध बाजूंनी आक्रमण करण्याचे कौशल्य असे दुर्मीळ गुण अंगी असतानाही आळशीपणामुळे साईप्रणीतचा घात होत असे. दुखापतींनी जर्जर शरीरामुळे जिंकण्यात सातत्य राखता येत नसे. दोन महिन्यांपूर्वी गोपीचंद यांनी साईला स्पर्धातून माघार घेऊन खांदे बळकट करण्याचा सल्ला दिला. घसरणाऱ्या क्रमवारीतील स्थानाची पर्वा न करता साईनं या सल्ल्याचे तंतोतंत पालन केलं आणि परिणाम जगासमोर आहे.

‘‘नैपुण्यवान खेळाडू हे वर्णन सुखावणारं असतं, पण माझी कामगिरी त्याला साजेशी होत नव्हती. या जेतेपदाने अनेक वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. प्रमुख खेळाडूंनी माघार घेतल्याने आव्हान सोपं झालं आहे. पुढील स्पर्धामध्ये हाच जिंकण्याचा सूर कायम राखण्याची जबाबदारी वाढली आहे,’’ हे २४व्या वर्षी अनुभवी खेळाडू असलेल्या साईप्रणीतचे उद्गार त्याच्या परिपक्वतेची ग्वाही देतात.

– पराग फाटक

parag.phatak@expressindia.com