क्वालालम्पूर : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत व सायना नेहवाल यंदाच्या वर्षांतील पहिल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत हे दोघे सहभागी होणार आहेत.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असणाऱ्या श्रीकांतला गेल्या वर्षी राष्ट्रकुलमधील रौप्यपदक वगळता एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नव्हते. मात्र नुकत्याच झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये श्रीकांतने बेंगळूरु रॅप्टर्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या सामन्यात श्रीकांतपुढे हाँगकाँगच्या का लाँग अंगुसचे आव्हान असणार आहे. राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या सायनासाठी मागील वर्ष लाभदायक ठरले. एशियाडमध्ये कांस्यपदक जिंकण्याबरोबरच तिने इंडोनेशिया, डेन्मार्क व सय्यद मोदी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
चिनी ब्रँडशी श्रीकांतचा ३५ कोटी रुपयांचा करार
नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा बॅडिमटनपटू किदम्बी श्रीकांतने सोमवारी लि-निंग या चिनी ब्रँडशी चार वर्षांसाठी ३५ कोटी रुपयांचा क्रीडा प्रायोजकत्वाचा करार केला आहे.
काही वर्षांपूर्वी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या आणि सर्वाधिक सहा सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतला चीनमधील लि-निंग या क्रीडासाहित्य निर्मिती करणाऱ्या प्रथितयश कंपनीने चार वर्षांसाठी करारबद्ध केले आहे.
लि-निंग ही कंपनी चीन, इंडोनेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या संघांना पुरस्कृत करीत आहे. गेल्या वर्षी जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी भारतीय चमूलाही याच कंपनीने पुरस्कृत केले होते. २०२०मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी भारतीय संघाच्या गणवेशाचेही ते पुरस्कर्ते आहेत.