थांबा आणि वाट पाहा! मी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा आवेश दाखवत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपण पदावर कायम असल्याचे प्रसारमाध्यमांच्या साक्षीने स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ हेच धोरण क्रिकेटजगताला स्वीकारावे लागणार आहे. याचप्रमाणे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी ऑगस्टपर्यंत स्पॉट-फिक्सिंगसंदर्भातील कायदा अस्तित्वात येणार असल्याचे सुतोवाच केले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, क्रिकेटपटू अजित चंडिला यांच्या पोलीस कोठडीमध्ये दिल्ली पोलिसांनी आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे.
‘राजीनामा देणार नाही’ ही हटवादी भूमिका कायम ठेवत खंबीरपणे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी अटकेत असलेला जावई गुरुनाथ मयप्पन याच्यावरील आरोपांची शहानिशा करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी आयोगाची घोषणा करत आपले नाणे खंबीरपणे वाजवण्याचा चोख प्रयत्न केला.
राजीनाम्याचा प्रश्नच नाही!
मी कोणताही गुन्हा किंवा द्रोह केलेला नाही, असे सांगत माझा राजीनामा बीसीसीआयने मागितलाच नसल्याचा दावा श्रीनिवासन यांनी केला. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाचे ज्या खेळाडूंवर आरोप सिद्ध होतील, त्यांच्यावर बीसीसीआय कठोर कारवाई करेल. माझ्या राजीनाम्याची बीसीसीआयमधून कुणीच मागणी केली नव्हती, सर्वाचा मला पाठिंबा आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार मी सांभाळत असून, मी माझे काम सुरूच ठेवणार आहे.
गुरुनाथच्या आरोपांची तपासणी करणार
गुरुनाथ मयप्पनवर जे आरोप झाले आहेत, त्याची तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. हा आयोग या प्रकरणाची चौकशी करेल. या आयोगाचा मी भाग नसेन आणि या आयोगामध्ये कोण असेल, याचा निर्णयही माझा नसेल. हा आयोग जो निर्णय देईल, तो मान्य असेल. आयोगातील तिन्ही सदस्य स्वतंत्रपणे मयप्पनवर लागलेल्या आरोपांची चौकशी करतील आणि आपला अहवाल सादर करतील.
आयोगात कोण असेल ?
या त्रिसदस्यीय आयोगामध्ये दोन व्यक्ती आयपीएलच्या कार्यकारिणी समितीमधील असतील, तर एक व्यक्ती बीसीसीआयमधील असेल. आयपीएलच्या पाच सदस्यीय कार्यकारिणी समितीमध्ये अरुण जेटली, राजीव शुक्ला, संजय जगदाळे, अजय शिर्के आणि रवी शास्त्री यांचा समावेश आहे.
प्रसारमाध्यमांचाही घेतला समाचार
प्रसारमाध्यमांनी माझ्याशी संलग्न असलेल्या बातम्या अतिरंजित करून प्रसिद्ध केल्याचे एन. श्रीनिवासन यांनी सांगितले. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे दिशाहीन होते, त्यामध्ये कुठलेच तथ्य नव्हते. प्रसारमाध्यमांनी माझ्याविरुद्ध आघाडी उघडली होती. माझ्याबद्दल ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या गेल्या त्या खोटय़ा होत्या.  
चेन्नई सुपर किंग्ज निष्कलंक!
चेन्नई सुपर किंग्ज संघावर कोणतेच आरोप नाहीत, संघ निष्कलंक आहे. संघाच्या कारभारात गुरुनाथची कोणतीच भूमिका नव्हती. गुरुनाथ हा उत्साही असल्यामुळे तो संघाबरोबर पाहायला मिळायचा. गुरुनाथ कंपनीच्या व्यवस्थापनात कुठेच नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा