विश्वासूंनी पाठ फिरवल्यावर स्वार्थ साधण्यासाठी भेटीचा घाट
आपल्या गटातील विश्वासू व्यक्तींनीच पाठ फिरवल्यावर हतबल झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्यकारी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी नागपूरला भेटून साद घातली. या वेळी आपला उमेदवार उभा करायचा की पवार उभे राहिल्यावर त्यांना पाठिंबा देऊन आपला स्वार्थ साधण्यासाठी श्रीनिवासन यांनी पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत श्रीनिवासन यांनी सांगितले की, ‘‘तुम्ही जे तर्कवितर्क लढवत आहात, तेच माझ्या मनात आहेत.’’
श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकल्यावर त्यांच्याविरोधात पवार यांनी पहिल्यांदा आवाज उठवला होता. श्रीनिवासन आणि पवार हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जातात, पण राजकारणात कुणी कुणाचाच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असे म्हटले जाते. त्यामुळे जर या दोन दिग्गज धुरिणांमध्ये मनोमीलन झाले तर बीसीसीआयची निवडणूक होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पवार यांची भेट घेण्यापूर्वी श्रीनिवासन यांनी बीसीसीआयमधील आपल्या विश्वासू व्यक्तींची भेट घेऊन साऱ्या गोष्टींचा अंदाज घेतला होता. श्रीनिवासन यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नेमके काय करायचे, यावर ६-७ संघटकांनी चर्चा केल्याचे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा