अमिताभ चौधरी पूर्व विभागाचे उमेदवार
नवी दिल्ली : जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या शर्यतीने वेग घेतला आहे. एकीकडे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर हे सारे अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, तर दुसरीकडे आपल्याला अध्यक्षपदावर विराजमान होता येणार नसल्याची पुरेपूर कल्पना असलेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अमिताभ चौधरी नावाचा हुकमी एक्का बाहेर काढला आहे आणि चौधरी यांना पूर्व विभाग पाठिंबा देणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

पूर्व विभागाचे म्हणणे काय?
जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर आपल्याच विभागातील व्यक्ती अध्यक्षपदावर विराजमान व्हायला हवी, असे पूर्व विभागाचे म्हणणे आहे. या वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये पूर्व विभागाने जगमोहन दालमिया यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव ठेवला होता.

चौधरी यांची उमेदवारी पक्की?
अमिताभ चौधरी हे पूर्व विभागातले आहेत, त्यामुळे या विभागातील सहापैकी चार संघटनांना चौधरी अध्यक्ष व्हावेत असे वाटत आहे. पण अन्य दोन संघटनांचा पाठिंबा चौधरी यांना मिळवावा लागेल.

चौधरींकडून निकष पूर्ण
बीसीसीआयच्या अध्यक्षांच्या पदासाठी असलेले निकष चौधरी पूर्ण करताना दिसत आहेत. ते बीसीसीआयचे पदाधिकारी आहेत, त्यांनी बीसीसीआयच्या सभेला उपस्थितीही लावली होती. त्याचबरोबर झारखंडमध्ये क्रिकेटच्या विकासाचे काम ते करत आहेत.
श्रीनिवासन यांच्याकडे १० मते
बीसीसीआयच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी ३० पैकी १६ मते मिळवणे गरजेचे असते. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याकडे ३० पैकी १० मते आहेत. त्यांनी अजून सहा मते मिळवली तर त्यांचे विश्वासू असलेले चौधरी अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतात.

निवडणूक होण्याची दाट शक्यता
यंदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. पूर्व विभागाने जरी अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवला आणि त्याला आव्हान देण्यासाठी जर एखादे वजनदार व्यक्तीमत्व उभे राहीले किंवा त्या वजनदार व्यक्तीने आपल्या विश्वासू व्यक्तीला उभे केले तर निवडणूक होऊ शकते आणि तशीच चिन्हे सध्या दिसत आहे. श्रीनिवासन यांच्या गटातून चौधरींची उमेदवारी पक्की समजली जात आहे. पण त्यांच्या विरोधात कोण कुणाला उभे करेल, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

अमिताभ चौधरी कोण?
अमिताभ चौधरी हे आयपीएस अधिकारी आहेत. त्याचबरोबर झारखंड क्रिकेट असोसिएशन चालवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या ते विश्वासातील आहेत. त्यामुळेच त्यांना राजीव शुक्ला यांच्याविरोधात मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत कोषाध्यक्षपदासाठी श्रीनिवासन यांनी उभे केले होते आणि चौधरी यांनी शुक्ला यांचा पराभव केला होता.

अजातशत्रू राजीव शुक्ला
बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे जवळपास बीसीसीआयमधील साऱ्या धुरीणांबरोबर चांगले संबंध आहेत. त्यांनी शरद पवार, एन. श्रीनिवासन, अनुराग ठाकूर यांना कोणत्याही प्रसंगी दुखावलेले नाही. पूर्व विभागातील काही संघटकही शुक्ला यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला शुक्ला हे सुरक्षित आणि सावध उमेदवार दिसत आहेत.

अनुराग ठाकूरही चर्चेत
अनुराग ठाकूर म्हणजे बीसीसीआयचा तडफदार आणि युवा चेहरा. भारतीय जनता पार्टीचे पाठबळ त्यांच्या मागे आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे सचिव म्हणून त्यांनी काही चांगली कामे केली आहेत. त्याचबरोबर दालमियांची गेल्या काही महिन्यांमध्ये प्रकृति अस्वस्थ्य असताना ठाकूर हे त्यांचे काम पाहत होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या कामाचा त्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे.

गांगुलीच्या नावाची चर्चा
भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा पदाधिकारी सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात असून त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. गांगुलीने प्रकर्षांने इच्छा प्रकट केल्यास त्याला पूर्व विभागाची मान्यता मिळू शकते. पण बीसीसीआयच्या राजकारणात तो निवडणूक जिंकेल का, हा मोठा प्रश्न
आहे.

श्रीनिवासन पडद्यामागेच
परस्पर हितसंबंधांच्या आरोपांमुळे या निवडणूकीमध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन उतरणार नाही, याची साऱ्यांनाच शाश्वती आहे. पण आयसीसी कार्याअध्यक्ष
या नात्याने ते स्थानिक संघटकांना आपल्याकडे काही आश्वासने देऊन वळवू शकतात. त्यामुळे स्वत: उभे न राहता त्यांनी अमिताभ चौधरी यांची पर्याय निवडला असला तरी पडद्यामागचे सूत्रधार तेच असतील.

पवार लढणार का?
जेव्हा आपण निश्चितपणे जिंकून येऊ शकतो, याची शाश्वती असते तेव्हाच पवार निवडणुकीसाठी उभे राहतात. त्यामुळे या घडीला जर त्यांच्याकडे १६ मते असली तर ते निवडणुकीला उभे राहतील. पण जर त्यांना हे मतांचे गणित निश्चित वाटत नसेल तर त्यांच्यापुढे बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष अजय शिर्के किंवा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर हे पर्याय खुले असतील.