* आयपीएलच्या अध्यक्षपदी रणजीब बिस्वाल यांची वर्णी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) अध्यक्षपदी पुन्हा एन.श्रीनिवासन यांची एक वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेन्नईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन यांची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत ते अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. तसेच भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक राहिलेले  रणजीब बिस्वाल यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बीसीसीआय कार्यकारिणीत कोणताच उमेदवार विरोधात नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित होती. तर, अरूण जेटली आणि निरंजन शहा यांनी उपाध्यक्षपदासाठी उभे न राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजीव शुक्ला यांच्यासह रवी सावंत, एस.के. बन्सल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संजय पटेल यांची सचिवपदी तसेच अनिरूद्ध चौधरी यांची कोषाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
बीसीसीआयची कार्यकारिणी:
अध्यक्ष : एन. श्रीनिवासन
उपाध्यक्ष : रवी सावंत (पश्चिम), राजीव शुक्ला (मध्य), एस. के. बन्सल (उत्तर)
सचिव : संजय पटेल
कोषाध्यक्ष : अनिरुद्ध चौधरी