स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर टीकेचा होत असलेला भडिमार आणि सत्यनिष्ठेवर उपस्थित केले जाणारे प्रश्न या सर्व गोष्टींना बाजूला सारत तामिळनाडूचे महत्त्वाकांक्षी उद्योगपती एन. श्रीनिवासन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर तिसऱ्या वर्षांसाठी बिनविरोधपणे निवड झाली आहे. परंतु अध्यक्षपद प्राप्त करूनही ते भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च पदावर सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश मिळेपर्यंत विराजमान होऊ शकणार नाही. रविवारी चेन्नईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन यांनी दाक्षिणात्य संघटक आणि निष्ठावंतांनाही यथोचित पदे देऊन सन्मानित केले.
अध्यक्षपदासाठी दक्षिण विभागाने नामनिर्देशित केलेले श्रीनिवासन हे एकमेव उमेदवार होते. याच विभागाने त्यांचा अध्यक्षपदाचा प्रस्ताव सादर केला, याचप्रमाणे अनुमोदनही केले. रविवारी बीसीसीआयच्या संपूर्ण कामकाजात श्रीनिवासन यांचा एकछत्री अंमल दिसून आला. एकाही व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध आवाज उठविण्याचे धारिष्टय़ दाखवले नाही. परंतु बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांची याचिका अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेवरील अंतिम सुनावणी सोमवारी होणार आहे. या निकालावरच श्रीनिवासन यांचे भवितव्य अवलंबून आहे.
या वेळी विविध समित्या आणि उपसमित्यांवर श्रीनिवासन यांनी आपल्या पाठीशी राहणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रशासकांची नेमणूक केली. आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात जावई गुरुनाथ मयप्पन अडकल्यामुळे श्रीनिवासन यांच्यासाठी गेले काही महिने अग्निपरीक्षेचे ठरले होते. परंतु इंडिया सीमेंट आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक असलेल्या श्रीनिवासन यांनी कुणालाही न जुमानता आपला हेका कायम राखत सत्तेची समीकरणे जुळवली.
राजीव शुक्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या आयपीएलच्या प्रमुखपदावर ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रणजिब बिस्वाल यांची वर्णी लागली आहे. याशिवाय स्नेह बन्सल (उत्तर), रवी सावंत (पश्चिम), राजीव शुक्ला (मध्य) अनुक्रमे अरुण जेटली, निरंजन शाह आणि सुधीर यांच्या जागी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. शिवलाल यादव (दक्षिण) आणि चित्रक मित्रा (पूर्व) यांचे उपाध्यक्षपद कायम राहिले आहे.
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर जेटली यांनी बीसीसीआयच्या कार्यकारिणीतून माघार घेतली आहे. तथापि, शरद पवार आणि शशांक मनोहर यांच्या गोटातील शाह आणि डबीर यांना पदासाठी मुदतवाढ मिळू शकली नाही. संजय पटेल आणि अनिरुद्ध चौधरी यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी आयपीएल प्रकरणानंतर राजीनामा दिल्यामुळे ही पदे रिक्त होती. आतापर्यंत पटेल यांनी प्रभारी सचिवपद सांभाळले होते.
झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांच्याकडे बीसीसीआयच्या विपणन समितीचे प्रमुखपद देण्यात आले. याचप्रमाणे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदावर केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष टी. सी. मॅथ्यू यांची नियुक्ती झाली आहे.
आंध्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव जी. गंगाराजू यांच्याकडे वित्त समितीचे प्रमुखपद, तर गोव्याच्या विनोद फडके यांच्याकडे प्रसारमाध्यम समितीचे प्रमुखपद देण्यात आले. आधी गंगाराजू आणि फडके श्रीनिवासन यांच्या विरोधात होते, परंतु पदे चालून आल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाल्याचे मानले जात आहे.
बिस्वाल यांच्यासाठी पूर्व विभागातील सर्व संघटना अनुकूल नव्हत्या, परंतु जगमोहन दालमिया यांचे नाव त्यांच्या वयाच्या मुद्दय़ावरून मागे पडल्यानंतर बिस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु अडचणीच्या काळात श्रीनिवासन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या दालमिया यांना उत्तर-पूर्व विभागाच्या विकास समितीचे प्रमुखपद देण्यात आले. याचप्रमाणे संयुक्त सचिव सुबीर गांगुली यांना आयपीएल प्रशासकीय समितीत, तर कोषाध्यक्ष बिस्वरूप दे यांना वित्त समितीमध्ये स्थान देण्यात आले.
भारताचे माजी यष्टिरक्षक मुंबईच्या चंद्रकांत पंडित यांच्या जागी १९ वर्षीय निवड समितीच्या अध्यक्षपदावर बडोद्याचे माजी सलामीवीर कॉनर विल्यम्स यांची वर्णी लावण्यात आली आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांना दौरा आखणी आणि नियोजन समितीवर स्थान देण्यात आले आहे.
श्रीनिवासन यांचे मंत्रिमंडळ
कार्यकारिणी समिती
अध्यक्ष : एन. श्रीनिवासन, उपाध्यक्ष : रवी सावंत (पश्चिम), राजीव शुक्ला (मध्य), एस. के. बन्सल (उत्तर), शिवलाल यादव (दक्षिण), चित्रक मित्रा (पूर्व), सचिव : संजय पटेल, संयुक्त सचिव : अनुराग ठाकूर, कोषाध्यक्ष : अनिरुद्ध चौधरी.
अखिल भारतीय राष्ट्रीय निवड समिती
अध्यक्ष : संदीप पाटील (पश्चिम), राजिंदरसिंग हंस (मध्य), रॉजन बिन्नी (दक्षिण), विक्रम राठोड (उत्तर), साबा करीम (पूर्व), संजय पटेल (सचिव/समन्वयक).
राष्ट्रीय ज्युनिअर निवड समिती
अध्यक्ष : कॉनर विल्यम्स (पश्चिम), प्रीतम गंधे (मध्य), अमन कुमार (उत्तर), के. जयरामन (दक्षिण), अरूप भट्टाचार्य (पूर्व), अनुराग ठाकूर (सचिव/समन्वयक).
महिला निवड समिती
अध्यक्ष : शांता रंगास्वामी (दक्षिण), गुलशन शर्मा (उत्तर), गार्गी बॅनजी (पूर्व), अमृता शिंदे (पश्चिम), रिता डे (मध्य), संजय पटेल (सचिव/समन्वयक).
पंच उपसमिती
अध्यक्ष : रवी सावंत (पश्चिम), सुनील देव (उत्तर), सुधाकर राव (दक्षिण), राजेश वर्मा (पूर्व), देवेंद्र सोलंकी (पश्चिम), भगवानदास सुतार (मध्य), संचालक : एस. वेंकटराघवन, ए. व्ही. जयप्रकाश (निवृत्त कसोटी पंच), अनुराग ठाकूर (सचिव/समन्वयक).
ज्युनिअर क्रिकेट समिती
अध्यक्ष : एस. पी. बन्सल, मेहबूब इक्बाल (उत्तर), टी. एन. अनंतनारायण (दक्षिण), मलाय चक्रवर्ती (पूर्व), राजू काणे (पश्चिम), शोएब अहमद (मध्य), अनुराग ठाकूर (सचिव/समन्वयक).
दौरा आखणी आणि नियोजन समिती
अध्यक्ष : राजीव शुक्ला, जी. एस वालिया (उत्तर), पी. यादगिरी (दक्षिण), सत्य मोहंती (पूर्व), नितिन दलाल (पश्चिम), महेंद्र शर्मा (मध्य), संजय पटेल (सचिव/समन्वयक).
वित्त समिती
अध्यक्ष : डॉ. जी गंगा राजू, अरुण ठाकूर (उत्तर), चेतन देसाई (दक्षिण), बिस्वरूप डे (पूर्व), निंरजन शाह (पश्चिम), किशोर देवानी (मध्य), अनिरुद्ध चौधरी (सचिव/समन्वयक).
आयपीएल प्रशासकीय समिती
अध्यक्ष : रणजिब बिस्वाल, टी. सी. मॅथ्यू, अमिताभ चौधरी, चेतन देसाई, निलय दत्ता, सुबीर गांगुली, रवी शास्त्री, जी. आर. विश्वनाथ, अरिंदम गांगुली (विशेष आमंत्रित), सी. के. खन्ना (विशेष आमंत्रित).
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मंडळ
अध्यक्ष : टी.सी. मॅथ्यू, उपाध्यक्ष : सुनील देव, एस. लोटलीकर, राजीव सिंग, राकेश पारिख, ग्यानेंद्र पांडे, के. एस. विश्वनाथ, सुजन मुखर्जी.
प्रसारमाध्यम समिती
अध्यक्ष : विनोद फडके, उपाध्यक्ष : राजीव जैन (उत्तर), डॉ. आर. एन. बाबा (दक्षिण), अनिल पटेल (पश्चिम), शरद पाध्ये (मध्य), सिबा प्रसाद त्रिपाठी (पूर्व).
तांत्रिक समिती अध्यक्ष : अनिल कुंबळे.
विपणन समिती अध्यक्ष : अमिताभ चौधरी.
वस्तू संग्रहालय समिती अध्यक्ष : डॉ. सी. पी. जोशी.
भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा समिती अध्यक्ष : अमिताभ चौधरी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा