२९ सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक बैठक
सर्वोच्च न्यायालयाने भलेही एन.श्रीनिवासन यांना दिलासा दिला नसला, तरी आजच्या बैठकीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)च्या बैठकीत ते पुनरागम करण्याची शक्यता होती, परंतु तसे काही झाले नाही. श्रीनिवासन बैठकीला हजर राहीले पण, त्यांच्या पुनरागमनाची कोणतीही चर्चा किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही. बैठकीत २९ सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक बैठक घेण्याचे ठरले आहे. ही बैठक चेन्नईला होणार असून बैठकी पर्यंतचे बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपदाचा कारभार जगमोहन दालमियाच पाहणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयने नेमलेल्या आयपीएल चौकशी समितीला ‘बेकायदेशीर आणि घटनाबाह्य’ ठरवले होते. या निर्णयाविरोधात बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सदर सुनावणी पुढे ढकलल्यामुळे श्रीनिवासन यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी श्रीनिवासन आणि बीसीसीआय यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे.