मुंबई हॉकी असोसिएशनने आडमुठी भूमिका घेत हॉकीपटूंना सराव करण्यास बंदी केली होती, पण खेळ आणि खेळाडूंचे नुकसान करणारी असोसिएशनच शहर दिवाणी न्यायालयात तोंडधशी पडली आहे. शहर दिवाणी न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आपल्या निर्णयात ‘खेळाडूंचे कोणतेही नुकसान होऊ नये’ असे म्हटले असून मुंबईतील हॉकीपटूंना चर्चगेट स्टेशननजीक असलेल्या हॉकी स्टेडियमचे दरवाजे सरावासाठी खुले झाले आहेत.
न्यायालयामध्ये ११ मार्चच्या पत्रानुसार खेळाडूंना खेळण्यास द्यावे, असे सरकारी वकिलांनी असोसिएशनच्या वकिलाला सांगितले असून, हा वाद आता संपुष्टात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने हॉकीपटूंना दिलासा मिळाला असून असोसिएशनला चांगलीच चपराक बसली आहे.
११ मार्चला मुंबई हॉकी असोसिएशनने एक पत्र क्रीडा संचालनालयाचे उपसंचालक एन. बी. मोटे यांना लिहिले होते, यामध्ये हॉकीपटूंना सकाळी ८ ते ११ या वेळेत खेळण्याची परवानगी देण्यात येईल, असे म्हटले गेले होते. पण त्यानंतर खेळाडूंनी नावे सादर केली नाहीत, असे म्हणत असोसिएशनने हॉकीपटूंना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. काही दिवसांमध्येच हॉकी इंडियाची स्पर्धा सुरू होत असल्याने सरावासाठी  स्टेडियम देऊ शकत नाही, असे असोसिएशनने हॉकीपटूंना सांगितले आणि पुन्हा एकदा त्यांना स्टेडियममध्ये परवानगी नाकारली होती.

Story img Loader