इंडियन बॅडमिंटन लीग या बहुचर्चित स्पर्धेला बुधवारी सुरुवात होत असून, क्रिश दिल्ली स्मॅशर्स आणि पुणे पिस्टन्स या संघात सलामीचा मुकाबला होणार आहे. नवी दिल्लीतील सिरी फोर्ट स्टेडियममध्ये होणाऱ्या या मुकाबल्यात बॅडमिंटनप्रेमींना शानदार खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. आयपीएलच्या धर्तीवर इंडियन बॅडमिंटन लीगची घोषणा झाली. मात्र त्यानंतर प्रायोजकांची शोधाशोध, लांबणीवर पडणारे लिलाव सत्र यामुळे ही स्पर्धा खरंच होणार का याबाबत साशंकता होती. मात्र सर्व अडथळे पार करत बुधवारी स्पर्धेचा सलामीचा सामना होणार आहे.
क्रिश दिल्ली स्मॅशर्सचे नेतृत्व दुहेरी विशेषज्ञ ज्वाला गट्टाकडे असणार आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत ज्वालाच्या साथीने खेळताना भारताला कांस्यपदक मिळवून देणारी अश्विनी पोनप्पा पुणे पिस्टन्सचे नेतृत्व करणार आहे. एकमेकींची साथीदार असणाऱ्या या दोघी आयबीएलच्या निमित्ताने एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत. ज्वाला मिश्र दुहेरीत व्ही.दिजूच्या साथीने खेळण्याची शक्यता आहे. दिल्ली स्मॅशर्ससाठी ही जोडी हुकमी एक्का असणार आहे. ज्वालाची सध्याची साथीदार प्राजक्ता सावंतही दिल्लीच्या ताफ्यात आहे. एकेरीत दिल्लीची भिस्त हाँगकाँगच्या वोंग विंग कीवर असणार आहे. त्याच्या साथीला एच.एस.प्रणॉय आणि बी.साईप्रणीथ हे युवा भारतीय खेळाडू असणार आहेत. नागपूरची अरुंधती पनतावणेला महिला एकेरीच्या सामन्यात संधी मिळू शकते. मलेशियाचा रशीद सिडेक हे दिल्ली स्मॅशर्सचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत. त्यांच्या अनुभवाचा स्मॅशर्सच्या खेळाडूंना उपयुक्त ठरू शकतो.
पुणे पिस्टन्सची दुहेरी आघाडी मजबूत आहे. अश्विनी पोनप्पासह सनावे थॉमस आणि रुपेश कुमार ही अनुभवी भारतीय जोडी पुण्याकडे आहे.
महिला दुहेरीत ज्युलियन शेंककडून पुण्याला मोठय़ा अपेक्षा आहेत. न्युगेन तिन मिन्ह जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याच्या साथीला अनुप श्रीधर आणि सौरभ वर्मा हे भारतीय खेळाडू आहेत. निखिल कानिटकर पुण्याचे प्रशिक्षक असणार आहेत.
वेळ : रात्री ८ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा