इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा आणि करोना महामारीमुळे खंडीत झालेल्या रणजी करंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठ संघ आपापसात भिडलेले आहेत. चारही सामने ६ जून ते १० जून या कालाधीत बेंगळुरूमध्ये खेळवले जात आहेत. उपांत्यपूर्व फेरी खेळणाऱ्या आठ संघामध्ये आयपीएल आणि भारतीय क्रिकेट संघातील अनेक तारांकित खेळाडू आहेत. मात्र, आयपीएलमध्ये धमाकेदार खेळ करणारे बहुतेक खेळाडू रणजीतील उपांत्यपूर्वी फेरीत अपयशी झाल्याचे चित्र आहे. याउलट, आपली पहिलीच रणजी स्पर्धा खेळणाऱ्या काही नवोदित खेळाडूंनी बहारदार खेळ करत सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत.
बेंगळुरूतील अलुरु क्रिकेट स्टेडियमवर रणजीचे उपांत्यपूर्व फेरीतील सामने खेळले जात आहेत. त्यात बंगाल-झारखंड, मुंबई-उत्तराखंड, कर्नाटक-उत्तर प्रदेश आणि पंजाब-मध्य प्रदेश हे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मारणारे फलंदाज रणजी क्रिकेटमध्ये मात्र धावांसाठी झगडताना दिसले. सोमवारी (६ जून) शुभमन गिल, पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल आणि मयांक अग्रवाल हे तारांकित खेळाडू अतिशय स्वस्तात बाद झाले. कर्नाटककडून खेळणारा मयंक अग्रवालही अवध्या १० धावा करून बाद झाला.
आयपीएल विजेत्या गुजरात संघातील सलामीवीर शुभमन गिलला मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी डोके वरती काढू दिले नाही. मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज पुनीत दातेने गिलला त्रिफळाचित केले. गिल केवळ नऊ धावा करून माघारी गेला. आयपीएलमध्ये दिल्लीचा सलामीवीर आणि रणजीमध्ये मुंबईचा कर्णधार असलेला पृथ्वी शॉदेखील केवळ २१ धावांवर बाद झाला. त्याला उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज दीपक धपलाने त्रिफळाचीत केले. पृथ्वीसोबत मुंबईसाठी सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाललाही मोठी खेळी करता आली नाही. तो ४५ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला.
क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू अपयशी ठरत असताना मुंबईच्या पदार्पणवीर सुवेद पारकरसारख्या काही खेळाडूंनी सामन्याचा पहिला दिवस गाजवला. भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो रणजी सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी २१ वर्षीय पारकरला मुंबईच्या संघात संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करत शतकी खेळी केली. पारकरने पहिल्या दिवशी २०६ चेंडूंचा सामना करत नाबाद १०२ धावांची खेळी केली. मुंबईकडून रणजी पदार्पणात शतक करणारा तो पृथ्वी शॉ नंतरचा पहिला फलंदाज ठरला आहे. पृथ्वी शॉने २०१६-१७ च्या रणजी हंगामात शतक केले होते.