भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व मिळविण्याच्या शर्यतीत सोनी, यूबी ग्रुप, गेम्स अनलिमिटेड आणि वर्ल्ड स्पोटर्स ग्रुपला मागे सारत येत्या चार वर्षांसाठी स्टार इंडियाने टीम इंडियासाठी प्रायोजकत्व प्राप्त केले आहे.
यातील वर्ल्ड स्पोटर्स ग्रुप सचिन तेंडुलकरचे प्रायोजकत्व सांभाळत होती. तर गेम्स अनलिमिटेड कंपनीकडे आर.अश्विन, उमेश यादव आणि अजिंक्य रहाणे या क्रिकेटपटूंचे प्रायोजकत्व आहे. यासर्वांवर मात करत स्टार इंडियाने भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व मिळविले आहे.
सध्याचे टीम इंडियाचे प्रायोजकत्व सांभाळणाऱया सहारा ग्रुपने ३१ डिसेंबर २०१३ नंतर भारतीय संघाच्या प्रायोजकत्वात माघार घेतल्यानंतर २०१४ या नव्या वर्षापासून भारतीय संघाचे प्रायोजकत्व मिळविण्यासाठी या मोठ-मोठ्या स्पोटर्स ग्रुपमध्ये चढाओढ सुरू होती. यात स्टार इंडियाला २०१४ पासून पुढील चार वर्षांचे प्रायोजकत्व दिले आहे. भारतीय संघाचे एका आंतराष्ट्रीय सामन्याच्या प्रायोजकत्वासाठी १.५ कोटी इतकी मूलभूत किंमत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निश्चित केली होती. मात्र, याआधी सहारा ग्रुप बीसीसीआयला एका आंतराष्ट्रीय सामन्यासाठी तब्बल ३.३४ कोटी इतके प्रायोजकत्व देत होती. परंतु, सहारा ग्रुप मालकीच्या पुणे वॉरियर्स संघाला आयपीएलमधून आर्थिक कारणासाठी बाद केल्यानंतर सहारा ग्रुपने भारतीय संघाचे प्रायोजकत्व मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते.
यानव्या प्रायोजकत्वानुसार, स्टार इंडिया भारतीय महिला संघ, १९ वर्षाखालील संघ आणि भारतीय ‘अ’ संघ यासर्वांचे प्रायोजकत्व सांभाळणार आहे. 

Story img Loader