Amit Mishra Breaks Silence On Domestic Violence Case: भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अमित मिश्राची पत्नी गरिमा तिवारीने क्रिकेटपटूवर घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. यासह क्रिकेटपटू आपल्या पत्नीला मारहाण करायचा, हुंड्यासाठी त्रास द्यायचा असे धक्कादायक आरोप देखील करण्यात आले आहेत. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. मात्र तुम्ही जो विचार करत आहात, तो हा अमित मिश्रा नव्हे. हा अमित मिश्रा उत्तरप्रदेश संघाकडून क्रिकेट खेळतो आणि यापूर्वी आयपीएल स्पर्धेतही झळकला आहे. नेमकं प्रकरण काय समजून घ्या.

मी तो अमित मिश्रा नव्हे..

हे प्रकरण कानपूरमध्ये राहणाऱ्या अमित मिश्राचे आहे. हा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तरप्रदेश संघाचं प्रतिनिधित्व करतो. यापूर्वी तो आयपीएल स्पर्धा देखील खेळताना दिसून आला आहे. हे प्रकरण समोर येताच, लोकांनी अमित मिश्राचं नाव पुढे केलं, जो भारतीय संघासाठी २२ कसोटी, ३६ वनडे आणि १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. भारताकडून खेळणाऱ्या अमित मिश्राने माध्यमांमध्ये ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या अफवा असल्याचं सांगितलं आहे. यासह त्याचं नाव आणि प्रतिमा वापरणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची धमकीही त्याने दिली आहे.

हे प्रकरण चर्चेत असताना अमित मिश्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की, ” माध्यमांमध्ये जे काही सुरू आहे, ते पाहून मी खूप निराश झालो आहे. मी नेहमीच प्रसारमाध्यमांचा सन्मान केला आहे. ती बातमी जरी खरी असली तरी, जी छायाचित्रे वापरण्यात आली आहेत, ती माझी आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. असंबंधित बातम्यांसाठी माझ्या प्रतिमेचा वापर करणं थांबवा. अन्यथा मला कायदेशीर कारवाई करायला भाग पाडलं जाईल.”

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेश संघाकडून खेळणाऱ्या अमित मिश्रावर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. गरिमा हिने केलेल्या आरोपांनुसार, अमित मिश्रा सोशल मीडियावर इतर मुलींशी बोलायचा. यासह तिला घटस्फोट देईल, अशी धमकीही द्यायचा. या तणावामुळे, मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण माझ्या आई- वडिलांनी मला वाचवलं, असं त्याच्या पत्नीचं म्हणणं आहे.