प्रो कबड्डी लीग (पीकेएल) पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही लीग खेळवली जात नव्हती, मात्र यावेळी तिचा आठवा हंगाम खेळवला जाणार आहे. कबड्डीचा थरार पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर येणार आहे. प्रो कबड्डी लीगचा हा मोसम २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. सध्या या लीगची तयारी जोरात सुरू आहे, जिथे देश आणि जगातील अनेक युवा आणि दिग्गज कबड्डीपटू आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहेत. अधिकृत प्रसारण भागीदार स्टार स्पोर्ट्सने सोमवारी प्रो कबड्डी लीगच्या या हंगामाचा प्रोमो जारी केला आहे, ज्यामध्ये भारताचा माजी कर्णधार धोनीची नवीन शैली पाहायला मिळत आहे.
प्रो कबड्डीच्या प्रोमोमध्ये महेंद्रसिंह धोनी एका खास अवतारात दिसत आहे. प्रोमोची थीम ‘तू ले पंगा है’ आहे, तर त्याचे घोषवाक्य ‘भिडेगा तो बढेगा’ आहे. या एका मिनिटाच्या प्रोमोमध्ये धोनी दिसला आहे. संपूर्ण प्रोमोमध्ये धोनीला लोकांसाठी प्रेरणेचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. तसेच, सर्व लीग सामने एकाच ठिकाणी खेळवले जातील, बायो बबलमध्ये राहणाऱ्या लीग सदस्यांच्या संपर्कात बाहेरील कोणीही येऊ शकणार नाही. धोनी सध्या कबड्डीला प्रोत्साहन देत असला, तरी पुढील वर्षी तो क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. आगामी आयपीएलमध्ये तो पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. त्याला नुकतेच चेन्नई सुपर किंग्जने १२ कोटी रुपयांना रिटेन्शन प्रक्रियेत कायम ठेवले आहे.