महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डीला प्रो-कबड्डी लीगच्या रूपाने व्यावसायिक कोंदण मिळाले. शेकडो प्रकाशझोत, कॅमेरे, दर्दी चाहते यांच्यासोबत झगमगत्या ताऱ्यांच्या उपस्थितीने प्रो-कबड्डी लीगची मुहूर्तमेढ रोवली गेली. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अमिताभसोबत संपूर्ण बच्चन कुटुंबीय, आमिर खान, शाहरूख खान, सुनील शेट्टी, टीना मुनीम, कबीर बेदी, सोनाली बेंद्रे, बोमन इराणी, फराह खान आदी मान्यवरांनी कबड्डीचे नभांगण उजळून गेले होते.
एसएससीआयच्या वातानुकूलित क्रीडा संकुलात ताऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्य क्रीडारसिकांच्या घोषणांनी स्टेडियम दुमदुमले. गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय, जय मुंबा या घोषणांप्रमाणेच रिशांक देवाडिगा, प्रशांत चव्हाण या स्थानिक खेळाडूंच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. जयपूर पिंक पँथर्स संघाची जर्सी परिधान करून पत्नी अंजलीसोबत आलेल्या सचिन तेंडुलकरने कबड्डीच्या स्टेडियममध्ये उत्साहाने हजेरी लावली. या वेळी तो म्हणाला, ‘‘कबड्डीच्या समर्थनासाठी मी इथे आलो आहे. अभिषेकने मला फोन केला आणि येण्याचे खास निमंत्रण दिले. मीसुद्धा शाळेत असताना कबड्डी खेळायचो, त्या आठवणी ताज्या झाल्या.’’
अभिनेता आमिर खाननेसुद्धा आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आणि खेळाला शुभेच्छा दिल्या. मुलगा अभिषेक बच्चनसाठी प्रो-कबड्डीच्या व्यासपीठावर आलेल्या अमिताभ बच्चनने सांगितले की, ‘‘मला बालपणीपासून या खेळाने भुरळ घातली आहे.  जोश, तंदुरुस्ती, श्वास आदी अनेक गोष्टींचा या खेळात कस लागतो.’’

Story img Loader