लाजिरवाणे पराभव, हकालपट्टी प्रकरण आणि दुखापतींनी गोत्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला अजून एक धक्का बसला असून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या घोटय़ाला दुखापत झाल्याने शस्त्रक्रीयेसाठी तो मायदेशी परतणार आहे. त्यामुळे चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही.
स्टार्कच्या उजव्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली असल्याने त्याला शस्त्रक्रीयेसाठी मायदेशी मंगळवारी पाठवण्यात येत आहे, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. दोन सामन्यांमध्ये स्टार्कला दोन बळी मिळवता आले होते. मोहालीतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ९९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती.
भारताच्या दौऱ्यादरम्यान स्टार्कला उजव्या पायाच्या हाडामध्ये दुखापत जाणवत होती. आता त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रीया करण्याची योग्य वेळ आहे. आता त्याच्या घोटय़ावर शस्त्रक्रीया झाली तर तो जुन महिन्यात होणाऱ्या अ‍ॅसेश मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकतो, असे ऑस्ट्रेलियाच्या संघाचे डॉक्टर पीटर ब्रुकनर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या आठवडय़ाच्या शेवटी मिचेलवर शस्त्रक्रीया करण्यात येईल. त्यानंतर तो या दुखापतीतून सावरून कधीपर्यंत क्रिकेट खेळायला तंदुरुस्त होईल, याकडे आमचे लक्ष असेल.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले की, स्टार्कच्या घोटय़ावर शस्त्रक्रीया करण्याची भविष्यात गरज पडेल, असे आम्हाला वाटले होते. तो बऱ्याच कालावधीपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्याच्यावर आता शस्त्रक्रीया झाली तर तो आम्हाला अ‍ॅशेस मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकेल. आमचा वैद्यकीय संघ त्याच्यावर लक्ष ठेवून असून तो इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकेल का, यावर आम्ही निर्णय घेऊ.
यापूर्वी वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्ड आणि मॅथ्यू वेड यांना दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले होते. त्याचबरोबर कर्णधार मायकल क्लार्क हा पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असून स्टार्कच्या रुपात त्यांना अजून एक धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा