तन्मय माळी, श्रेया दांडेकर सर्वोत्कृष्ट खेळाडू

ठाण्याच्या पुरुषांनी अवघ्या एका गुणाने पुण्यावर, तर पुण्याच्या महिलांनीही एका गुणाने नागपूरवर मात करून राज्यस्तरीय वरिष्ठ गट बास्केटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

पुरुषांचा अंतिम सामना कमालीचा चुरशीचा झाला. मध्यंतराला पुण्याकडे ३८-३६ अशी दोन गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतरही आघाडी पुण्याने टिकवून ठेवली होती. अखेरीस तन्मय माळीने लागोपाठ दोन बास्केट करून ठाण्याला ८४-८३ असा एका गुणाने विजय मिळवून दिला. तन्मय माळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूही ठरला. महिलांमध्ये नागपूरविरुद्ध मध्यंतराला पुणे संघ तीन गुणांनी पुढे होता. त्यानंतर नागपूरने बरोबरी साधत सामना रंगतदार स्थितीत आणला. श्रेया दांडेकरने आपल्या अनुभवाच्या जोरावर पुण्याला एका गुणाची आघाडी मिळवून दिली आणि पुण्याने विजेतेपद पटकावले. पुण्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी श्रेया स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा संघटक संभाजी कदम, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष परवेज पिरजादे, गोविंद मुथ्थुकुमार, उपाध्यक्ष रवी नायर, जयंत देशमुख, प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, स्पर्धेचे प्रमुख संयोजक झाकीर सय्यद, सहसचिव समीर घोडके आदींच्या उपस्थितीत झाले.

Story img Loader