१६ वर्षीय राज्यस्तरीय फुटबॉलपटूचा पुलाखाली सराव
ऊन पावसापासून जेमतेम सुरक्षित राहील, यासाठी प्लॅस्टिकने आच्छादलेली एक झोपडी. एका कोपऱ्यात एकावर एक रचलेली शाळेची तीन दप्तरे. दुसऱ्या कोपऱ्यात जमिनीपासून वर आलेल्या दगडाभोवती साडीचा आडोसा उभारून तयार केलेले ‘न्हाणीघर’. किंग्ज सर्कल रेल्वेपुलाखालील इतर झोपडय़ांसारखेच ते घर. पण याच घरात लहानाची मोठी झालेली १६ वर्षांची मेरी नायडू आज राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. पुलाखालच्या रस्त्यावर आपल्या भावांसह फुटबॉलचा सराव करणाऱ्या मेरीचं घर ‘गोलपोस्ट’पेक्षाही छोटं असेलही; पण तिच्या कर्तृत्वाने या प्रतिकूल परिस्थितीला लाथ मारत स्वप्नांचा चेंडू उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने भिरकावला आहे.
किंज सर्कलच्या रेल्वेपुलाखाली राहणारे प्रकाश नायडू पालिकेच्या स्वच्छता विभागात कंत्राटी कामगार आहेत. रोजच्या रोजीचे तीन-चारशे रुपये आले की त्यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. अशा तुटपुंज्या उत्पन्नात मुलांना क्रीडाप्रशिक्षण तर सोडाच, पण शिक्षण द्यायचेही वांधे. पण सहा वर्षांपूर्वी शीव परिसरातील एका सामाजिक संस्थेने गरिबांच्या मुलांसाठी फुटबॉल प्रशिक्षण सुरू केले आणि लहानपणापासूनच मैदानी खेळांची आवड असलेल्या मेरीच्या छंदाला दिशा मिळाली. फुटबॉलमध्ये चमक दाखवू लागलेल्या मेरीला पुढे क्रीडा संकुलात प्रशिक्षणासाठी दाखल करण्याची ऐपत नायडू कुटुंबाकडे नव्हती. मात्र, याच संस्थेच्या मदतीने मेरीचे फुटबॉल प्रशिक्षण सुरू राहिले. मेरीनेही मिळालेल्या संधीचे सोने केले. सप्टेंबरमध्ये ‘११ मिशन’ या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत राज्याराज्यांमधील फुटबॉलमध्ये कौशल्य असणाऱ्या ११ मुलांची निवड करण्यात आली. यासाठी अंधेरीच्या क्रीडा संकुलात विविध स्पर्धामधून राज्यातील एका खेळाडूची निवड करण्यात आली. यामध्ये मेरीने बाजी मारली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
सध्या मेरी शीव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षण घेत आहे. या शाळेत मुलींची फुटबॉल टीम नसल्याने मेरीला जिल्हा आणि राज्यपातळीवर सहभागी होता आले नाही, असे मेरीचे प्रशिक्षक परवेज शेख यांनी सांगितले. मात्र गेल्या चार वर्षांत मेरी अनेक खासगी स्पर्धामध्ये सहभागी झाली आहे व आपल्या चमूला चांगली गुणसंख्याही मिळवून दिली आहे. मेरीमध्ये सामथ्र्य आहे. व्यावसायिक प्रशिक्षण न घेताही केवळ स्वत:च्या मेहनतीवर तिला चांगले यश मिळाले आहे,’ असे शेख यांनी सांगितले.
अनधिकृत झोपडय़ांवर होणाऱ्या कारवाईदरम्यान मेरीचे तोडकेमोडके घर अनेकदा जमिनदोस्त झाले आहे. त्यात घरगुती वस्तूंबरोबरच तिची पदकेही गहाळ झाली आहेत. याचा परिणाम तिचा अभ्यास व खेळावरही होतो. परंतु, आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर मेरी प्रत्येक स्पर्धेत बाजी मारून जाते. किंग्ज सर्कल येथील रेल्वे पुलाखाली मेरी व तिचे भाऊ-बहीण फुटबॉलचा सराव करतात. कधी रस्त्यावर, पदपथावर तर झोपडीच्या आजूबाजूला जिथे शक्य तिथे आम्ही फुटबॉल खेळतो, असे मेरी सांगते.
‘सुरुवातीच्या काळात मेरीला एकटीला प्रशिक्षणासाठी वा स्पर्धेकरिता पाठवायला भीती वाटायची. मात्र आता मेरीचा आत्मविश्वास दुणावला आहे. मेरीचे यश पाहून खूप अभिमान वाटतो,’ असे मेरीच्या आई बबिता नायडू सांगतात.
यंदा मेरी दहावीत आहे. वाशीच्या फादर अॅग्नेल या महाविद्यालयात महिलांची फुटबॉल टीम चांगली असल्याने पुढल्या वर्षी तेथे दाखल होण्याची तिची इच्छा आहे. पण त्याहीपुढे भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातून खेळण्याचे सामथ्र्य दाखविण्याचे तिचे स्वप्न आहे.