पांचगणीमधील ‘टेबल लँड’ हे सपाट पठार पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. याच्याच पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पांचगणी व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर सोमवारपासून रंगणारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा म्हणजे पांचगणीमधील आणि आसपासच्या गावांसाठी जणू पर्वणीच असणार आहे. या स्पध्रेच्या निमित्ताने येथील ग्रामस्थांना अव्वल कबड्डीपटूंचा थरार पाहण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या कबड्डी स्पध्रेत पुरुष व्यावसायिक आणि महिला अशा दोन गटांत एकंदर २६ संघ सहभागी होणार आहेत. राज्यपातळीवरील व्यावसायिक पुरुष विजेत्या संघाला ५५ हजार रुपये आणि चषक, तर महिला गटातील विजेत्या संघाला ३३ हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात येईल. याशिवाय उपविजेत्या आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांनाही बक्षिसे देण्यात येतील. याचप्रमाणे स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात येईल.
स्पध्रेची गटवारी
पुरुष व्यावसायिक – अ गट : महाराष्ट्र पोलीस, जेजे हॉस्पिटल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, स्टेट बँक; ब गट : युनियन बँक, मुंबई पोलीस, पुणे पोलीस, हिंदुजा हॉस्पिटल; क गट : सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँक, मध्य रेल्वे; ड गट : आरसीएफ, मुंबई पोस्टल, देना बँक, ठाणे पोलीस.
महिला गट : अ गट : शिवशक्ती, अमरहिंद, होतकरू, जागृती प्रतिष्ठान, एमडी स्पोर्ट्स; ब गट : राजमाता जिजाऊ, मुंबई पोलीस महिला जिमखाना, सुवर्णयुग, ठाणे पोलीस महिला जिमखाना, डॉ. शिरोडकर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level kabaddi competition at panchgani