कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी क्रीडासंकुलात सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी आणि कोल्हापूर यांनी महिला गटात विजयी सलामी दिली. तर पुरुषांच्या लढतीत मुंबई उपनगर व नागपूर यांच्यातील चुरशीचा सामना बरोबरीत सुटला.
यजमान कोल्हापूरच्या महिला संघाने लातूरला ४२-१२ असे सहज हरवले. रत्नागिरीने नागपूरचे कडवे आव्हान २१-१४ असे थोपविले. सांगली संघाला मात्र रत्नागिरीकडून ५ गुणांनी पराभूत व्हावे लागले.    
मध्यंतराला कोल्हापूरने २५-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर लातूरने कडवा प्रतिकार केला. पण कोल्हापूरने हा सामना ४२-१२ असा जिंकला. नागपूर महिला संघाने रत्नागिरीचा २१-१४ असा ७ गुणांनी पराभव केला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या विद्यमाने सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पुरुष गटात, मुंबई उपनगर व नागपूर यांच्यातील पुरुषांचा सामना १४-१४ असा बरोबरीत सुटला. मध्यंतराला नागपूरकडे ८-७ अशी एका गुणाची आघाडी होती. नागपूरच्या शशांक वानखेडेने एकाच चढाईत चार गुण मिळवत १२-९ अशी आघाडी मिळवून दिली होती. पण त्यांना ती टिकविता आली नाही. मुंबई उपनगरकडून अनुज पाडावे, सचिन पाष्टे, निखिल मोरे यांनी तर नागपूरकडून शशांक वानखेडे, शंकर बोकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. ‘अ’ गटात, रत्नागिरीने सांगलीचा १३-७ असा पराभव केला.
विजेत्या खेळाडूंची घडणार दुबईवारी!
खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी घडावी, यासाठी संयोजकांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पुरुष आणि महिला संघातील प्रत्येकी १२ खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाला दुबईची वारी करण्याची संधी मिळेल, अशी घोषणा संयोजक सतेज पाटील यांनी करत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.