मुंबई : बंडय़ा मारुती सेवा मंडळातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत नांदेडच्या बाबुराव चांदेरे फाऊंडेशन पुरुष गटात, तर मुंबई शहरच्या शिवशक्ती संघाने महिला गटात विजेतेपद पटकाविले. स्वस्तिकचा आकाश रूडले पुरुषांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. तर, शिवशक्तीची अपेक्षा टाकळे महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने उपनगरच्या स्वस्तिक मंडळाचा प्रतिकार ३५-१९ असा सहज मोडून काढत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या काही मिनिटांतच स्वस्तिकवर लोण देत १०-०१ अशी आघाडी घेतली. पण, स्वस्तिकने देखील त्यानंतर जशास तसे उत्तर देत हा लोण फेडत ही आघाडी ११-१२ अशी कमी केली. मध्यंतराला १५-१३ अशी फाऊंडेशनकडे आघाडी होती. दुसऱ्या डावात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने आपला खेळ अधिक गतिमान करीत आणखी दोन लोण स्वस्तिकवर चढविले. दुसऱ्या डावात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने २३ गुणांची कमाई केली तर, स्वस्तिकला अवघे सहा गुण मिळविता आले.
महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्सचा ३९-१८ असा सहज पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले. धारदार चढाया व भक्कम पकडी करीत शिवशक्तीने पूर्वार्धातच प्रतिस्पध्र्यावर तीन लोण चढवीत ३१-०९ अशी भक्कम आघाडी घेतली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असणाऱ्या शिवशक्तीने सामना लीलया आपल्या बाजूने झुकवला.