BCCI on Suryakumar Yadav: भारतीय संघाला जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. जिथे संघाला दोन कसोटी, पाच टी२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारत या दौऱ्याची सुरुवात १२ जुलै रोजी कसोटी मालिकेने करणार आहे. त्याचबरोबर या दौऱ्यासाठी बीसीसीआयने कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला वन डे संघात स्थान मिळाले असले तरीदेखील कसोटी संघात स्थान मिळाले नाही. आता बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने याबाबत वक्तव्य केले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “वेस्ट इंडिज दौऱ्यापेक्षा २०२३च्या विश्वचषकाशी त्याचा अधिक संबंध आहे. खराब कामगिरीनंतरही सूर्यकुमारने वन डे संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे. मिस्टर ३६०ने त्याची खेळी अशीच पुढे सुरु ठेवत टीम इंडियाला विजय मिळवून द्यावेत. त्याच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. सूर्याने टी२० आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष द्यावे.”
“हे स्पष्ट आहे की जर सूर्या संघात असता तर तो ऋतुराज किंवा यशस्वीच्या पुढे खेळला असता पण संघाला नवीन खेळाडूंना संधी द्यायची आहे, त्यांनाही वापरून पाहायचे आहे. मात्र, सूर्या अद्याप कसोटी फॉरमॅटमधून बाहेर पडलेला नाही. आशिया चषक आणि विश्वचषक तोंडावर असताना, भारतासाठी तो खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याने सध्या व्हाईट बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कसोटीमध्ये त्याला नंतर संधी मिळेल.” असे त्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले.
अधिकाऱ्याने हे देखील स्पष्ट केले की, “पाहा, ‘द-स्काय’ म्हणून चाहत्यांचा लाडका असणारा सूर्या हा एक अतिशय सक्षम आणि चाणाक्ष फलंदाज आहे. सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, तो ३२ वर्षांचा आहे आणि आपल्याला भविष्यासाठी संघाची योजना आखायची आहे.’ तिथेच यशस्वी किंवा ऋतुराजसारखे कोणीतरी असे खेळाडू येतात आणि त्याला मागे टाकतात. तो चेंडूचा क्लीन स्ट्रायकर आहे आणि धावांचा वेग सेट करू शकतो. जर तो आपली क्षमता सिद्ध करू शकला तर ते भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगले असेल.”
दुलीप ट्रॉफीच्या पश्चिम विभागीय संघात सूर्यकुमार यादवचा समावेश
२८ जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी सूर्यकुमार यादवचा पश्चिम विभागीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराही दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. निवड समितीने ज्या दोन युवा खेळाडूंचा कसोटी संघात समावेश केला आहे. त्यात यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या नावांचा समावेश आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एस. भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.