Kevin Pietersen advice to Prithvi Shaw : इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनने पृथ्वी शॉच्या प्रतिभेचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की त्याने आपली उर्जा तंदुरुस्त होण्यावर केंद्रित केली पाहिजे आणि त्याला पुन्हा एकदा यशाची चव चाखायची असेल तर सोशल मीडियापासून दूर राहावे. शॉने किशोरवयात पदार्पण करताना कसोटी शतक झळकावले. वयाच्या २५ व्या वर्षी, तो त्याच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे जिथे आयपीएलमधील कोणताही संघ त्याला विकत घेऊ इच्छित नाही. आयपीएल २०२५ च्या लिलावातील कोणत्याही फ्रँचायझीने ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीतही त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही.
केव्हिन पीटरसनने पृथ्वी शॉला दिला महत्त्वाचा सल्ला –
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफसह अनेकांना वाटते की पृथ्वीच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वाचा त्याच्या मैदानावरील खेळावर नक्कीच परिणाम झाला आहे. आता पीटरसनने या विषयावर आपले मत मांडले आहे. त्याने पृथ्वीला सल्ला दिला आहे. त्याने ‘एक्स’वर लिहिले, ‘खेळात पुनरागमनाच्या काही उत्तम कथा आहेत. जर पृथ्वी शॉच्या आजूबाजूला चांगले लोक असतील आणि ज्यांना त्याच्या यशाची काळजी असेल तर ते त्याला सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगतील. त्याचबरोबर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी कठोर मेहनत घेण्यासाटी प्रोत्साहित करतील. हे त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणेल, जिथे भूतकाळातील यश परत मिळवता येईल. तो खूप प्रतिभावान खेळाडू आहे.’
३०-४० कोटी रुपये कमावल्याने शॉची कारकीर्द धोक्यात आली –
अलीकडेच शॉला जास्त वजन आणि अनफिट असल्यामुळे मुंबई रणजी संघातून वगळण्यात आले होते. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने पुनरागमन केले. पण अद्याप काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही. पृथ्वीच्या पडझडीबद्दल आधी बोलताना, दिल्ली कॅपिटल्सचे माजी टॅलेंट स्काउट आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे म्हणाले की इतक्या लहान वयात जवळपास ३०-४० कोटी रुपये कमावल्याने शॉची कारकीर्द धोक्यात आली असावी. शॉ डीसी संघापर्यंत आणण्यात मोठा वाटा राहिला. त्यांनी पृथ्वीला विनोद कांबळीचे उदाहरण दिले होते, पण त्याचा शॉवर काही फरक पडला नाही.
आयआयएम पदवीधरालाही इतके पैसे मिळत नाहीत –
प्रवीण अमरे पुढे म्हणाले, ‘दिल्ली कॅपिटल्समुळे शॉने वयाच्या २३ व्या वर्षी ३०-४० कोटी रुपये कमावले असतील. आयआयएम पदवीधरालाही इतके पैसे मिळतील का? एवढ्या लहान वयात तुम्ही एवढं कमावता, तेव्हा तुम्ही पूर्ण लक्ष गमावून बसता. पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे, चांगले मित्र कसे बनवायचे आणि क्रिकेटला प्राधान्य कसे द्यायचे हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे आहे. अनुशासनहीनतेमुळे पृथ्वीच्या कारकिर्दीला बाधा आली. त्याने पुनरागमन केल्यानंतर त्याची चांगली कामगिरी करण्याचीभूक हरवली होती.’
पृथ्वी शॉची प्रतिभा विरुद्ध दिशेने जातेय –
हेही वाचा – Pink Ball Test : पिंक बॉल टेस्ट म्हणजे काय? त्याचा वापर डे-नाईट सामन्यात का केला जातो? जाणून घ्या
प्रवीण अमरे पुढे म्हणाले, ‘पृथ्वी शॉची प्रतिभा विरुद्ध दिशेने जात आहे, हे निराशाजनक आहे. मला कोणीतरी सांगितले की सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये सराव सामन्यात पृथ्वीने शानदार शतक झळकावले होते. कदाचित त्याला ग्लॅमर आणि पैसा, आयपीएलचे दुष्परिणाम सांभाळता आले नाहीत. भारतीय क्रिकेटमधील केस स्टडी हे त्याचे उदाहरण देता येईल. त्याच्यासोबत जे घडत आहे ते इतर क्रिकेटपटूंच्या बाबतीत घडू नये. केवळ प्रतिभा तुम्हाला शिखरावर नेऊ शकत नाही. त्यासाठी शिस्त, दृढनिश्चय आणि समर्पण महत्वाचे आहे.’