झ्वेरेव्हवर पाच सेटमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवत प्रथमच अंतिम फेरीत

पॅरिस: पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या उपांत्य लढतीत जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह याचे आव्हान परतवून लावत प्रथमच फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो ग्रीसचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.

यापूर्वी ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तीन वेळा पराभव पत्करणाऱ्या त्सित्सिपासने यावेळी झ्वेरेव्ह याच्यावर ६-३, ६-३, ४-६, ४-६, ६-३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्सित्सिपासला आता पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी १३ वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकणारा राफेल नदाल किंवा जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील विजेत्याशी लढत द्यावी लागेल.

‘‘अ‍ॅथेन्स स्टेडियमच्या बाहेर बसून मी फ्रेंच ग्रँडस्लॅमसारख्या मोठय़ा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न बाळगले होते. माझ्यासाठी उपांत्य फेरीतील विजय खूप मोठा आहे. झ्वेरेव्हला लढत देऊ शकलो, याचेच मला समाधान आहे,’’ असे त्सित्सिपासने सांगितले.

पहिले दोन्ही सेट सहजपणे जिंकल्यानंतर त्सित्सिपासला झ्वेरेव्हच्या कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. झ्वेरेव्हने त्सित्सिपासची सव्‍‌र्हिस भेदत तिसरा सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर चौथ्या सेटमध्येही झ्वेरेव्हने सर्वोत्तम खेळ करत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. पण पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये त्सित्सिपासने झ्वेरेव्हची सव्‍‌र्हिस दोन वेळा मोडीत काढली. अखेरच्या क्षणी झ्वेरेव्हने चार मॅटपॉइंट वाचवले, पण पाचव्या प्रयत्नांत त्सित्सिपासने बाजी मारत अंतिम फेरीत स्थान मिळवले.

क्रेजिकोव्हा-सिनियाकोव्हा अंतिम फेरीत

बाबरेरा क्रेजिकोव्हा हिला मेरी पियर्सनंतर महिला एकेरी आणि दुहेरीची जेतेपदे पटकावण्याची संधी आहे. चेक प्रजासत्ताकच्या क्रेजिकोव्हाने आपली सहकारी कॅटरिना सिनियाकोव्हा हिच्यासह पोलंडची मॅगदा लिनेट आणि अमेरिकेची बेर्नाडा पेरा यांच्यावर ६-१, ६-२ अशी मात करत महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांना अंतिम फेरीत पोलंडची इगा श्वीऑनटेक आणि अमेरिकेची बेथनी मट्टेक-सँडस यांच्याशी झुंज द्यावी लागेल.

Story img Loader