ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात चांगलेच अडकलेत आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. पण स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर एखाद्या वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दक्षिण आफ्रिकेविरोधात बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नरला २०१६ मध्येही पंचांनी ताकीद दिली होती. शेफिल्ड शिल्ड २०१६ दरम्यान ही ताकीद देण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळण्यात आलेल्या तिस-या कसोटी सामन्यात कॅमरन ब्रॅनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली होती. यानंतर स्टीव्ह स्मिथने हा आमच्या रणनीतीचा भाग असल्याची कबुली दिली होती. स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर दोषी आढळल्यानंतर त्यांना कर्णधार आणि उपकर्णधारपद गमवावं लागलं होतं. त्यांच्यावर एक वर्षाची बंदीही घालण्यात आली असून, नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये त्यांना याआधीही ताकीद देण्यात आली होती हे समोर आलं आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, माजी अम्पायर डेरिल हार्पर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मॅच रेफरी आणि पंच निवड व्यवस्थापक सायमन टॉफेल यांना ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, नोव्हेंबर २०१६ मध्ये विक्टोरिया विरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात स्मिथ आणि वॉर्नर न्यू साऊथ वेल्सचं प्रतिनिधित्व करत होते. यावेळी त्यांना ‘फेअर प्ले’साठी ताकीद देण्यात आली होती.

हार्पर यांनी ई-मेलमध्ये लिहिलं होतं की, ‘सामन्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा डेव्हिड वॉर्नर विकेटकीपर पीटर नेव्हिलकडे चेंडू देत होता, तेव्हा वारंवार बाऊंस करत होता. पंचांनी ही बाब स्टीव्ह स्मिथच्या निदर्शनास आणून दिली होती, पण त्याने काहीच लक्ष दिलं नाही. पुढच्या दिवशी मी प्रशिक्षक जॉनस्टन यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांचा राष्ट्रीय संघाचा कर्णधार बॉल टॅम्पिरिंगसारख्या प्रकरणात अडकायला नकोय असं सांगितलं’.

सामन्यात पराभव झाल्यानंतर स्मिथने सिडनी क्रिकेट मैदानाबद्दल तक्रार केली होती आणि आपण शेफिल्ड शिल्ड सामना खेळून खुश नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला होता असंही हार्पर यांनी म्हटलंय.

Story img Loader