Ravindra Jadeja Vs Steve Smith Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऐतिहासिक कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा चौथा सामना जिंकण्यासाठी भारताचे खेळाडू मैदानावर कंबर कसताना दिसत आहेत. कारण पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्याचे पाहायला मिळत आहे. कांगांरुंनी जबरदस्त सुरुवात केल्यानंतर टीम इंडियाने ४ गडी बाद करून सामन्यात पुन्हा एकदा वापसी केली. ९० षटकांच्या इनिंगनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४ बाद २५५ वर पोहोचली आहे.

कर्णधार स्टीव्ह स्मिथची भारताचा डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजाने दांडी गुल केली. जडेजाने टाकलेल्या चेंडूवर स्मिथला मोठा फटका मारता आला नाही. जडेजाच्या भेदक गोलंदाजीला समजण्यात स्मिथचा पुरता गोंधळ उडाल आणि त्याला पव्हेलियनचा रस्ता पाहावा लागला. स्मिथची विकेट गेल्यानंतर तो काहिसा रागात मैदानाच्या बाहेर पडल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्वीटरवर शेअर केला आहे.

पहिल्या इनिंगचं ६४ वा षटक टाकण्यासाठी आलेल्या जडेजाने चौथ्या चेंडूवर जडेजाची विकेट घेतली. चेंडू अपेक्षेप्रमाणे उसळला नसल्याने स्मिथसाठी फटका मारणे अडचणीचे ठरले आणि त्याला विकेट गमवावी लागली. जडेजाच्या चेंडूवर स्मिथला सावधपणे फटका मारायचा होता. पण चेंडूची एज लागल्याने स्मिथ बोल्ड झाला. त्यानंतर स्मिथने बॅटला खेळपट्टीवर रागाने आपटण्याचा प्रयत्न केला. स्मिथ ३८ धावांवर बाद झाला. १३८ चेंडूत ३ चौकार मारून स्मिथने ३८ धावा केल्या.

नक्की वाचा – Video : बाबर आझमची झुंझार खेळी, PSL मध्ये दमदार शतक ठोकून रचला इतिहास, विराट-रोहितला टाकलं मागे

इथे पाहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सलामीवीर ट्रॅविस हेडने ३२ धावांची तुफानी खेळी करत उस्मान ख्वाजासोबत जबरदस्त सुरुवात केली. आश्विनची गोलंदाजी ट्रॅविस हेडला डोकेदुखी ठरली. कारण ३२ धावांवर असताना अश्विनच्या गोलंदाजीवर हेड बाद झाला. त्यानंतर लाबुशेनला शमीने क्लीन बोल्ड केलं. तो अवघ्या ३ धावा करून तंबूत परतला.

विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बानीज मैदानात पोहोचले. सामना सुरु होण्याआधी दोन्ही पंतप्रधानांनी त्यांच्या देशाच्या कर्णधारांना कॅप दिली. हा सामना भारतासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकण अनिवार्य आहे. जर भारताचा पराभव झाला किंवा सामना रद्द झाला, तर भारताला श्रीलंका किंवा न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सीरिजची प्रतिक्षा करावी लागेल.