India vs Australia 2023 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर भारतीय संघाचा निम्मा संघ ५० धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये पाठवला. भारताला पाचवा धक्का हार्दिक पांड्याच्या रूपाने बसला, त्याचा झेल स्टीव्ह स्मिथने शानदार हवेत झेप मारत पकडला.
स्टीव्ह स्मिथने घेतला अविश्वसनीय झेल –
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या बॅटमधून धावा येत नसल्या तरी त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच चकित केले आहे. स्लिपमध्ये उभं राहून स्मिथ सतत उडी मारत असतो आणि एकामागून एक झेल घेत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने प्रथम कर्णधार रोहित शर्माचा खाली वाकून झेल घेतला, त्यानंतर हार्दिक पांड्याचा हवेत उडी मारून झेल घेतला.
खरं तर, मिचेल स्टार्कच्या शानदार स्पेलनंतर, शॉन अॅबॉट १० व्या षटकात गोलंदाजी आला होता. पहिल्या चेंडूवर त्याने हार्दिक पांड्याला चकित केले, तर दुसरा चेंडू बाहेर गेला. पंड्याला त्याचा चेंडू मारता आला नाही आणि चेंडू बॅटच्या कडा लागून मागे गोला. त्यावेळी अचानक स्टीव्ह स्मिथने चेंडूच्या दिशेने हवेत उडी मारत एका हाताने झेल पकडला. त्यामुळे भारतीय संघाला पाचवा धक्का बसला.
मिचेल स्टार्कचा धमाका –
मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलिया संघाकडून शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्या पाचपैकी चार विकेट एकट्याने घेतल्या. ज्यामध्ये त्याने शुबमन गिल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल या भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर सीन अबॉटने हार्दिक पांड्याला तंबूत धाडले.
भारताला सातवा धक्का –
२० व्या षटकात ९१ धावांवर भारताला सातवा धक्का बसला. नॅथन एलिसने रवींद्र जडेजाला कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला ३९ चेंडूत १६ धावा करता आल्या. २० षटकांनंतर भारताची धावसंख्या ७ बाद ९२अशी आहे.