IND vs AUS 4th Test Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रविवारी पार पडला. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावत कसोटी क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर विराट कोहली २६४ चेंडूत १८६ धावांवर बाद झाला. या दरम्यानचा ऑस्ट्रेलिया संघाच्या क्षेत्ररक्षणाचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया संघाच्या क्षेत्ररक्षणाचा व्हायरल होत असलेला फोटो, हा विराट कोहलीला बाद करण्यासाठी लावलेल्या क्षेत्ररक्षणाचा आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथला विराट कोहलीचे द्विशतक होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे त्याने क्षेत्ररक्षणात एक मोठा बदल केला होता. स्मिथने विराट कोहलीसाठी ९ क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाठवले होते. मात्र विराट कोहली डीप मिडविकेटवर मार्नस लांबूशेनच्या हाती झेलबाद झाला.
ऑस्ट्रेलियन कर्णधाराने या फील्ड प्लेसमेंटचा अवलंब केला. कारण विराट कोहली तळातील फलंदाजांसोबत फलंदाजी करत होता. तसेच भारताला आघाडी घेण्यासाठी आणि त्याला द्विशतक नोंदवण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावा करायच्या होत्या. अशात विराट कोहली बाद झाल्याने स्मिथला त्या फील्ड प्लेसमेंटचा फायदा झाला. कारण एका बाजूने तळाचे फलंदाज बाद होत गेल्याने, विराटवर दबाव वाढला होता. त्याचबरोबर श्रेयस अय्यर फलंदाजीला येऊ शकणार नव्हता.
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला –
विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७५ वे शतक आहे. त्याने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. कोहलीच्या आधी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ५६६ डावांत ७५ शतके पूर्ण केली, तर कोहलीने ५५२ डावांत हा पराक्रम केला.
हेही वाचा – IND vs AUS: विराटने कसोटी शतकाचा दुष्काळ संपवताच लावली विक्रमांची रांग, जाणून घ्या पराक्रमांची यादी
भारताचा पहिला डाव –
भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने ९१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक १८६ धावा केल्या. त्याचवेळी शुबमन गिलने १२८ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही ७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेट पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. त्यामुळे भारताचा डाव नऊ विकेट्सवर संपला.