Steve Stolk breaks Rishabh Pant’s record for fastest fifty : दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्टॉकने धावांचे वादळ निर्माण केले आहे. स्टीव्हने स्कॉटलंडविरुद्ध अशी झंझावाती खेळी खेळली, जी कधीही विसरता येणार नाही. या फलंदाजाची ही खेळी इतिहासाच्या पानात कायमची नोंद झाली आहे. जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज मैदानात आले, तेव्हा दक्षिण आफ्रिकेत पाण्याचा नव्हे तर षटकार आणि चौकारांचा पाऊस सुरू झाल्यासारखे वाटले. चाहत्यांनीही या पावसाचा खूप आनंद घेतला.
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत शनिवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने स्कॉटलंडविरुद्ध सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने ९ गडी गमावून २६९ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलामीवीर स्टीव्ह स्टॉकची धमाकेदार सुरुवात आणि शेवटच्या डावात डेव्हन मारेसच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर अवघ्या २७ षटकांत ३ गडी गमावून विजय मिळवला.
ऋषभ पंतचा विक्रम मोडला –
स्टॉकने स्कॉटिश गोलंदाजाच्या एका षटकात ३४ धावांचा पाऊस पाडला. स्टीव्हने या षटकात पाच षटकार आणि एक चौकार लगावला आहे. स्टीव्ह स्टॉकने केवळ झंझावाती खेळीच खेळली. त्याने या शानदार खेळीच्या जोरावर भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतचा विक्रमही मोडीत काढला आहे. या सामन्यापूर्वी जो विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता, तो आता स्टीव्हने आपल्या नावावर नोंदवला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता. २०१८ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्याने नेपाळविरुद्ध अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. पंतने हा विक्रम सहा वर्षे राखला होता, मात्र आता दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्हने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने १३ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ३७ चेंडूत ८६ धावांची खेळी साकारली.
२७० धावांचा पाठलाग अवघ्या २७ षटकांत केला –
स्टीव्ह स्टॉकने या डावात केवळ ३७ चेंडूत ८६ धावांची खेळी केली आहे. या वादळी खेळीदरम्यान स्टीव्हच्या बॅटमधून ७ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकारही आले. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्कॉटिश संघाने ९ विकेट गमावून २६९ धावा केल्या. या सामन्यात काट्याची टक्कर होऊ शकते असे वाटत होते, पण दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज स्टीव्ह स्टोकने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या २७ षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.