भारताचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने मोडला आहे. श्रीलंकाबरोबर डरबन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात स्टेनने ही कामगिरी केली आहे. कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमानेला बाद करत स्टेनने कपिल देव यांच्या ४३४ विकेटची बरोबरी केली होती. आज दुसऱ्या दिवशी स्टेनने श्रीलंकेच्या आणखी एका फलंदाजाला माघारी पाठवत कपिल देवचा ४३४ विकेट घेण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.
कपिल देवने १३१ कसोटी सामन्यात २९.६४ च्या सरासरीने ४३४ विकेट घेतल्या आहेत. स्टेनने ९२ व्या कसोटी सामन्यात कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये स्टेन आता आठव्या स्थानावर पोहचला आहे. सध्या सुरू असेलल्या कसोटी सामन्यात स्टेनला इंग्लंडच्या ब्रॉडला मागे टाकण्याची संधी आहे. ब्रॉडच्या नावार १२६ कसोटी सामन्यात ४३७ विकेट आहेत. श्रीलंकेचा मुरलीधरन १३३ कसोटी सामन्यात ८०० विकेटसह अव्वल स्थानावर आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २३५ धावांवर आटोपला. प्रत्युत्तर मैदानात उतरलेल्या लंकेच्या संघाची अवस्था सध्या खराब आहे. ९० धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेचे पाच फलंदाज तंबूत गेले आहेत.