महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. यानंतर विराटने यशस्वीपणे संघाचं नेतृत्व करत स्वतःला सिद्ध केलं आहे. विराटच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. मात्र भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांच्या मते, विराट हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार नाही. किरमाणींच्या मते धोनीच भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे.
“प्रत्येक कालखंडामध्ये विविध कर्णधारांनी भारताचं नेतृत्व केलं आहे. ज्यावेळी धोनी भारताचा कर्णधार होता, त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये (टी-२०, वन-डे आणि कसोटी) भारताला सर्वोत्तम स्थानी पोहचवलं. धोनी हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे. विराट कोहलीला आणखी वेळ द्यायला हवा. त्याला आणखी थोडे विक्रम मोडू द्या. तुम्ही विराटला सर्वोत्तम कर्णधार म्हणू शकत नाही, धोनीने मोठ्या मेहनतीने हे पद मिळवलं आहे. विराटला यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.” स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत किरमाणी बोलत होते.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात निर्भेळ यश संपादन केलं. टी-२०, वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताने वेस्ट इंडिजवर मात केली. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार आहे. १५ सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून, या मालिकेत दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.