पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूला जातीवाचक शब्द उच्चारल्याबद्दल सॉमरसेटचा गोलंदाज क्रेग ओव्हरटोनवर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही शिक्षा खूपच कमी असून अशा गुन्ह्य़ाबद्दल कडक कारवाई करावी, अशी मागणी क्रिकेट वर्तुळात केली जात आहे.
ससेक्स संघाकडून खेळणारा फिरकी गोलंदाज आशर झैदीला इंग्लिश कौंटी सामन्यात ओव्हरटोनने जातीवाचक शिविगाळ करीत मायदेशात जाण्याचा सल्ला दिला होता. ओव्हरटोनने हे शब्द उच्चारत इंग्लिश क्रिकेट मंडळाच्या नियमावलीचा भंग केला. त्यामुळे त्याच्यावर दोन सामन्यांकरिता बंदी घालण्यात आली. या सामन्यातील पंच अ‍ॅलेक्स वॉर्फ व ससेक्सचा फलंदाज मायकेल यार्डी यांनी ओव्हरटोनने शिविगाळ करताना ऐकले होते. पंच वॉर्फ यांनी आपल्या अहवालात ओव्हरटोनने गुन्हा केला असल्याचे नमूद केले होते. मात्र झैदीने आपण ओव्हरटोनचे कोणतेही अपशब्द ऐकले नसल्याचे सामन्याधिकाऱ्यांना सांगितले होते. ओव्हरटोननेही आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगितले.
‘‘हे प्रकरण मंडळाच्या शिस्तपालन समितीकडून हाताळले जात आहे. ही समिती स्वतंत्रपणे काम करीत असते. त्याचा मंडळाच्या कारभाराशी थेट कोणताही संबंध नाही,’’ असे इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, ओव्हरटोनला इंग्लंडच्या हिवाळी शिबिरात स्थान देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा