भारत आणि पाकिस्तान यांच्यात २५ डिसेंबरपासून होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तानी क्रिकेटरसिकांना व्हिसा देताना केंद्र सरकारने कडक नियम अवलंबले आहेत. सामन्याची तसेच परतीची तिकिटे दाखवल्यास आणि भारतीय पुरस्कर्ता असलेली कागदपत्रे सादर करणाऱ्यांनाच एकापेक्षा जास्त शहरांचा व्हिसा देण्यात येईल.
केंद्रीय गृहमंत्रालयाने यासाठी एक समिती स्थापन केली असून सामन्याची तिकिटे, परतीची तिकिटे दाखवल्यानंतरच पाकिस्तानी चाहत्यांना भारतात प्रवेश दिला जाणार आहे. गृहमंत्रालयाने या मालिकेला हिरवा कंदील दाखवला असून आपण नियमांत कोणतेही बदल करणार नाहीत, असे त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळविले आहे.
२००७च्या क्रिकेट मालिकेनंतर १२ क्रिकेटरसिक पाकिस्तानात पोहोचलेच नाहीत. तसेच याच मालिकेदरम्यान दहशतवादी साजीद मिर याने क्रिकेटचाहता म्हणून मोहाली आणि नवी दिल्लीला भेट दिली होती आणि महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन त्याने निरीक्षणही केले होते, असे लश्कर-ए-तैबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीने अमेरिकेच्या सुरक्षा संस्थांना चौकशीदरम्यान सांगितले होते. त्यावरूनच हे नियम कठोर करण्यात आले आहेत.या मालिकेसाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट मंडळातील अधिकाऱ्यांना एकापेक्षा जास्त शहरांचा व्हिसा देण्यासाठी गृह मंत्रालयाने त्यांची यादी मागवली आहे. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या चाहत्याने खरेदी केलेल्या तिकिटाची छायाप्रत (झेरॉक्स) जोडणे आवश्यक आहे, असेही गृहमंत्रालयाने
 कळवले आहे.

Story img Loader