आंबेवाडी येथे २०१०मध्ये झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेतील सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) आणि बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) यांच्यातील सामना निश्चित झाला होता. याचे पडसाद कबड्डीविश्वात तीव्रतेने उमटले होते. अशा प्रकारच्या घटना कबड्डीमध्ये अनेकदा घडल्याचे आढळते. या पाश्र्वभूमीवर अभ्युदयनगरात १६ ते २० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या शिवसेनाप्रमुख चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत संयोजक महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लबने कडक पावले उचलली आहेत.
‘‘या स्पध्रेत कोणताही संघ जाणूनबुजून सामना गमावत असेल किंवा पुरस्कार रकमेसाठी प्रतिस्पर्धी संघाशी समझोता करीत असल्याचे निदर्शनास आले तर त्या संघावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्या संघाला स्पध्रेतून बाद करण्यात येईल आणि त्यांची रोख बक्षिसे आणि अन्य सुविधा काढून घेतल्या जातील,’’ असा इशारा संयोजन समितीचे सचिव आणि प्रशिक्षक भार्गव कदम यांनी दिला
आहे.
‘‘भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या नियमानुसार आम्ही आमच्या प्रवेशअर्जात सहभागी संघांना याबाबत सूचना केल्या आहेत,’’ असे ते पुढे म्हणाले.
एकंदर आठ लाख रुपये पारितोषिक रकमेच्या या स्पध्रेतील पुरुष आणि महिला गटातील विजेत्याला प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून, प्रत्येक गटात २०-२० संघ सहभागी होणार आहेत.
पुरुष गटात एअर इंडिया, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा, भारत पेट्रोलियम, उत्तर प्रदेश पोलीस, विजया बँडक, आंध्र बँक, हिंदुस्थान एरोनॉटिक्स या संघांचा समावेश आहे.
महिला गटात डॉ. शिरोडकर, चेंबूर क्रीडा केंद्र, अमर हिंद, पालमकोट,  सुवर्णयुग, बाबा हरिदास हे संघ सहभागी होणार आहेत. याचप्रमाणे बऱ्याच वर्षांनी कोलकाताचा नूतन बाजार अशोका हा महिला संघही मुंबईत खेळताना दिसणार आहे.

Story img Loader