ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय संघाच्या मेन्यूमध्ये बीफ नसणार आहे. बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे तशी विनंती केली आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खेळाडूंचा प्रवास, सराव आणि खानपानसंबंधी व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दोन आधिकाऱ्यांचे पथक ऑस्ट्रेलियात गेलं आहे. खेळाडूंसाठी असलेल्या मेन्यूमध्ये शाकाहारी पदार्थांचा समावेश असावा, अशी शिफारस या पथकानं ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे केली आहे. नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे.
नुकत्याच झालेल्या इंग्लड दौऱ्यावेळी भारतीय संघाच्या लंच मेन्यूत ‘ब्रेस्ड बीफ पास्ता’च्या समावेशावरून बीसीसीआयवर टीका झाली होती. त्यामुळे आता बीसीसीआयने सावध पवित्रा घेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मेन्यूत बीफ न ठेवण्याची विनंती केली आहे. २१ नोव्हेंबर २०१८ ते १८ जानेवारी २०१९ दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२०, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
फळांची आणि जेवणाची व्यवस्था भारतीय पद्धती करावी अशी विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केली आहे. बीसीसीआयच्या पथकातील सूत्रांनी मुंबई मिररला सांगितलं की, ‘ऑस्ट्रेलियात मिळणाऱ्या जेवणाबाबत खेळाडूंनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. शाकाहारी खेळाडूंना अधिक त्रास होतो. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील एका भारतीय हॉटेल व्यवस्थापकाशी बोलणं झालं आहे.’ गेल्या दौऱ्यावेळी इशांत शर्माला या समस्येचा समाना करावा लागल्याचेही सुत्रांनी सांगितले.
भारतीय संघाच्या सुत्रांनी सांगितले की, ‘सध्या खेळाडू आपल्या खानपानसंबंधी विशेष काळजी घेतात. पूर्वी अशा दौऱ्यामध्ये खेळाडू चीज बर्गरही खात असायचे. आता सर्वकाही बदलले आहे. खानपानसंबंधी आता सर्व खेळाडू शिष्टाचार वापरत आहेत. सध्याचे खेळाडू बीफपासून दूर आहेत.’