सॉल्ट लेक हिवाळी ऑलिम्पिकचे संयोजनपद देताना झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे ऑलिम्पिक चळवळीची प्रतिष्ठा धोक्यात आली होती. ती प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी गेली बारा वर्षे मी झगडलो व यशस्वी झालो यातच मला समाधान आहे, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष जॅक्वीस रॉज यांनी येथे सांगितले. रॉज हे या पदावरून रविवारी निवृत्त होत आहेत. आयओसीच्या परिषदेला येथे शनिवारी सुरुवात झाली, त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘२००१ मध्ये मी जेव्हा अध्यक्षपदी विराजमान झालो, त्या वेळी आयओसीविषयी जनमानसात फारशी चांगली प्रतिमा नव्हती. ऑलिम्पिकचे संयोजनपद देताना गैरव्यवहार होतात, अशीच प्रतिक्रिया ऐकावयास मिळत होती. तथापि, मला अध्यक्षपदी निवडताना संघटकांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्याच विश्वासाच्या आधारे मी गेली बारा वर्षे ऑलिम्पिकचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.’’

Story img Loader