Stuart Broad and Todd Murphy Video Viral: ॲशेस २०२३ च्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राखली. या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील स्टुअर्ट ब्रॉडचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.स्टुअर्ट ब्रॉडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा कसोटी सामना होता. आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात या वेगवान गोलंदाजाने शेवटचे दोन विकेट घेतल्या. हा सामना स्टुअर्ट ब्रॉडच्या ‘ट्रिक’मुळेही लक्षात राहील.
दोन वेळा जेव्हा इंग्लंड संघ विकेटच्या शोधात होता, तेव्हा त्याने बेल्स बदलल्या आणि दोन्ही वेळा त्याला यश मिळाले. या त्याच्या ट्रिकने पहिल्या डावात मार्नस लाबुशेनला आऊट केले, तर दुसऱ्या डावात त्याच ट्रिकने टॉड मर्फीला तंबूचा रस्ता दाखवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोमवारी संध्याकाळी ओव्हलवरील प्रेक्षक उत्साहात होते. पाचवी कसोटी जिंकण्यासाठी आणि ॲशेस मालिका २-२ अशी बरोबरीत ठेवण्यासाठी इंग्लंडला अंतिम सत्रात शेवटच्या दोन विकेट्सची गरज होती. कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणारे स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अली गोलंदाजी करत होते, पण ॲलेक्स कॅरी आणि टॉड मर्फी चांगली फलंदाजी करत होते. ऑस्ट्रेलियन्सने कोणतीही घाई न करता प्रत्येक चेंडू त्याच्या गुणवत्तेनुसार खेळला. चांगल्या चेंडूंविरुद्ध बचावात्मक खेळ केला आणि खराब चेंडूंवर धावा केल्या.
स्टुअर्ट ब्रॉडच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती निराशा –
विकेट न मिळाल्याची निराशा स्टुअर्ट ब्रॉडच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तोपर्यंत त्याने पन्नासहून अधिक धावा दिल्या होत्या, पण एकही बळी घेता आला नाही. जेव्हा तो गोलंदाजी करायला धावत असे तेव्हा चाहते टाळ्या वाजवत होते, पण जेव्हा फलंदाज चेंडूचा बचाव करायचा किंवा चौकार मारायचा तेव्हा आवाज कमी होता.
९१व्या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर ब्रॉडने अखेरच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या डावात पहिली विकेट घेण्यासाठी बेल बदलण्याची ट्रिक आजमावली. त्यानंतर जे घडले ते चमत्कारापेक्षा कमी नव्हते. ब्रॉडने ऑफ साइडच्या बाहेर एक चांगला चेंडू टाकला जो टॉड मर्फीच्या बॅटला लागला आणि विकेटच्या मागे गेला. यानंतर जॉनी बेअरस्टोने डावीकडे ड्रायव्हिंग करून झेल पूर्ण केला. अशा प्रकारे त्याने मार्नस लाबुशेनप्रमाणे टॉड मर्फीला बाद केले.