चेंडूने बॅटची कड घेऊन उडालेला झेल पहिल्या स्लिपमध्ये पकडला गेल्याचे माहीत असतानाही खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहणारा इंग्लंडचा खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड याच्यावर लॉर्ड्स येथील दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी बंदी आणावी, अशी मागणी वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी केली आहे.
अ‍ॅश्टन अगरच्या चेंडूवर उडालेला झेल मायकेल क्लार्कने टिपला. ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी अपीलसुद्धा केले, पण पाकिस्तानचे पंच अलीम दार यांनी ब्रॉडला नाबाद ठरवले. ‘‘आपण बाद असल्याचे कळताच, फलंदाज पंचांनी निकाल देण्याच्या आतच मैदान सोडतात, पण मैदानावरच थांबून राहण्याचा ब्रॉडचा निर्णय आयसीसीने पाहावा. वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक दिनेश रामदिनने चुकीच्या झेलसाठी अपील केल्याप्रकरणी स्टुअर्टचे वडील आणि सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी त्याला दोन सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली होती. अखिलाडूवृत्ती करणाऱ्या रामदिनला आयसीसी शिक्षा सुनावत असेल तर ब्रॉडला त्यांनी शिक्षा का करू नये,’’ असा सवाल होल्डिंग यांनी केला आहे.

Story img Loader