Australia team gives guard of honor to Stuart Broad: इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. ॲशेस कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. या सामन्याच्या चौथ्या दिवशी तो जेम्स अँडरसननंतर शेवटच्या वेळी फलंदाजीला आला आणि कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या डावात तो ८ धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी, या सामन्यात इंग्लंडचा संघ ३९५ धावांवर ऑलआऊट झाला आणि कांगारू संघाला विजयासाठी ३८४ धावांचे लक्ष्य दिले.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दिला गार्ड ऑफ ऑनर –
पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जेव्हा स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनसोबत फलंदाजीसाठी बाहेर पडला, तेव्हा त्याला संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाने गार्ड ऑफ ऑनर दिला. त्याचबरोबर त्याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल कौतुक केले. कांगारू संघातील खेळाडूंच्या कृतीने सर्व चाहत्यांची मने जिंकली.
स्टुअर्ट ब्रॉडने शेवटच्या चेंडूवर लगावला षटकार –
ब्रॉडने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटच्या चेंडूवर शानदार षटकार लगावला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने ८ चेंडूत नाबाद ८ धावा केल्या, ज्यात एका षटकाराचा समावेश होता. ब्रॉडने मिचेल स्टार्कच्या चेंडूवर हा षटकार मारला. स्टार्कने हा चेंडू शॉर्ट टाकला ज्यावर ब्रॉडने स्वत:ला मागे खेचले आणि पुल शॉट खेळला. तो चेंडू षटकारासाठी डीप मिडविकेटच्या दिशेने गेला.
ब्रॉड आणि अँडरसनने मोडला कॅलिस-बाऊचरचा विक्रम –
स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी एकत्रितपणे सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत जॅक कॅलिस आणि मार्क बाउचर यांचा विक्रम मोडला आणि ते दुसऱ्या क्रमांकावर घसरलेत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये जोडी म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत, ब्रॉड आणि अँडरसनची जोडी दुसऱ्या क्रमांकावर आली. या दोघांनी इंग्लंडसाठी एकूण १३८ कसोटी सामने खेळले. कॅलिस आणि बाउचर यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी एकत्र १३७ कसोटी सामने खेळले आहेत. ही जोडी तिसऱ्या क्रमांकावर घसरली. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी एकत्र १४६ कसोटी सामने खेळले.
हेही वाचा – IND vs WI 2nd ODI: ‘जुलैमध्ये फक्त आठ दिवस खेळले…’; विराट-रोहितला विश्रांती देण्यावर आकाश चोप्राचा सवाल
सर्वाधिक कसोटी एकत्र खेळणारी जोडी –
१४६ सामने – सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (१९९६-२०१२)
१३८ सामने – जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड (२००८-२०२३)
१३७ सामने – जॅक कॅलिस आणि मार्क बाउचर (१९९८-२०१२)
१३२ सामने – राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (१९९६-२०१२)
१३० सामने – ॲलिस्टर कुक आणि जेम्स अँडरसन (२००६-२०१८)