IND vs AUS Sunil Gavaskar angry reaction on Rishabh Pant : मेलबर्न कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत सापडला होता, पण ऋषभ पंतने आपले वाकडे-तिकडे फटके खेळणे सोडले नाही. ही शैली त्याला चांगलीच महागात पडली, त्यामुळे तो २८ धावा करून बाद झाला. सहसा पंत विचित्र शॉट्स खेळून नेहमी विरोधी संघाला चकित करतो, पण यावेळी कांगारू संघाने त्याच्यावर वर्चस्व राखले आहे. त्याची विकेट अशा वेळी पडली, जेव्हा भारताला फॉलोऑन वाचवण्यासाठी ८५ धावा करायच्या होत्या. या चुकीमुळे पंतला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर भारतीय दिग्गज सुनील गावस्करांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेलबर्न कसोटीत तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने भारतीय डावाला १६४ धावांपासून पुढे सुरुवात केली. पंत-जडेजा चांगली फलंदाजी करत होते, त्यामुळे ते भारतीय संघाचा डाव सावरतील अशी अपेक्षा होती. कारण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. पण क्रीझवर सेट असूनही पंत त्याची विकेट ऑस्ट्रेलियाला फुकटात देईल, हे कोणास ठाऊक होते. स्कॉट बोलंडच्या चेंडूवर रॅम्प शॉट मारण्यात तो अपयशी ठरला, पण पुढच्याच चेंडूवर त्याने तीच चूक पुन्हा केली आणि नॅथन लायनने त्याचा झेल घेतला.

मूर्खपणाला एक मर्यादा असते – सुनील गावस्कर

मेलबर्न कसोटीत तिसऱ्या दिवशी समालोचन करताना सुनील गावस्कर म्हणाले, “मूर्खपणाची एक मर्यादा असते. तिथे दोन क्षेत्ररक्षक उभे असताना, तरीही तुम्हाला तोच शॉट खेळायचा आहे. तुम्ही आधीचा शॉट मिस केला होता आणि आता बघा कोणत्या क्षेत्ररक्षकाने तुमचा झेल घेतला आहे. याला विकेट्स देणे म्हणतात हा तुमचा नैसर्गिक खेळ नाही. हा एक मूर्खपणाने खेळलेला शॉट आहे. ज्यामुळे तुम्ही संघाची निराशा केली आहे. कारण तुम्ही संघाची परिस्थिती काय आहे, हे नीट समजून घेतले पाहिजे.”

ऋषभ पंत सोशल मीडियावर ट्रोल –

ऋषभ पंतने फाइन लेगवर पिकअप लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला. चेंडू त्याच्या पोटात लागला, त्यामुळे तो अस्वस्थता झाला. यानंतर पुढच्याच चेंडूवर तो ऑफ-स्टंपच्या पलीकडे गेला. त्याने आणखी एक लॅप शॉट खेळण्याची योजना आखली. यावेळी चेंडू डीप थर्ड मॅनकडे गेला, तिथे नॅथन लायनने उत्कृष्ट झेल घेतला. ज्यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली. ज्यामुळे आता त्याला चाहते सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

हेही वाचा – SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने केला कहर! पदार्पणातच ‘हा’ विश्वविक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून २४४ धावा केल्या होत्या. सध्या नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर खेळत आहेत. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला अजूनही ३१ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. या बाबतीत भारत अजूनही २३० धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या रूपाने भारताला आज दोन धक्के बसले. पंत आणि जडेजा यांच्यात ३२ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी बोलंडने तोडली. त्याने पंतला झेलबाद केले. पंतने ३७ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. तर जडेजा नॅथन लायनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्याला १७ धावा करता आल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stupid stupid rishabh pants bizarre dismissal at mcg leaves sunil gavaskar fuming during ind vs aus 4th test vbm