मुंबई उपनगर खो-खो संघटनेच्या १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत दत्तसेवा क्रीडा मंडळाने गतविजेत्या महात्मा गांधी स्पो. अकादमीचा पराभव करून मुलींचे विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात दत्तसेवा क्रीडा मंडळाने महात्मा गांधी स्पो. अकादमीचा १४-१२ (९-५, ५-७) असा २ गुणांनी पराभव करून जेतेपदावर आपले नाव कोरले. दत्तसेवाच्या आरती कदम (२.३० मि. नाबाद, १.१० मि. व ४ गडी), अंकिता जडय़ार (१.१० मि. व २ मि. व ३ गडी), रचना कवळे (२.२० मि. व १.१० मि. व १ गडी) व पूजा कदम (१.३० मि., २.२० मि. व २ गडी) या विजयाच्या प्रमुख शिल्पकार होत्या.  कुमार गटाचा महात्मा गांधी स्पो. अकॅडमी विरुद्ध प्रबोधन हा सामना अपुऱ्या प्रकाशामुळे रद्द करण्यात आला व दोन्ही संघांना विजेतेपद विभागून देण्यात आले. मुलींच्या गटात तृतीय क्रमांक परांजपे स्पो. क्लबने स्वराज्य क्रीडा मंडळावर १३-७ (१३-२, ०-५) असा १ डाव व ६ गुणांनी मात केली. परांजपेच्या श्रुती सकपाळ (२.५० मि. नाबाद व ३ गडी), नेहा घाडीगावकर (२ मि., ३.५० मि. व १ गडी), कल्पिता गावकर (४.१० मि.), समीक्षा सुरवसे (३.१० मि. व ४ गडी) चमकल्या.

Story img Loader