World Cup 2023: भारताने बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश बनून ऐतिहासिक कामगिरी केली. १४ जुलै रोजी प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-३ अंतराळयानाने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:०४ वाजता सॉफ्ट लँडिंग केले आणि देशभरात एकच जल्लोष झाला. हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाचे एक दिवस (१४ पृथ्वी दिवसांच्या समतुल्य) तपशीलवार विश्लेषण करेल आणि तिथे पाणी आहे का? याचा शोध घेईल. अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. मात्र, यादरम्यान मुंबई इंडियन्सचे ट्वीट व्हायरल होत आहे.
भारताचे चांद्रयान यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्यामुळे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ISRO आणि IPL फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर या प्रसंगी एक मजेदार चित्र पोस्ट केले आहे. मुंबई इंडियन्सने इस्रोच्या या यशाचा संबंध क्रिकेटशी जोडला आणि लिहिले की, “२०१९ मध्ये इस्रो आणि भारतीय संघ दोन्ही अयशस्वी ठरले होते. आता इस्रो आणि त्यांची टीम यशस्वी झाली आहे, त्यामुळे भारतीय संघ देखील यशस्वी होईल आणि २०२३चा विश्वचषक जिंकेल यावर आमचा विश्वास आहे.”
टीम इंडिया २०१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरली आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाली. २०१९ मध्येच, इस्रोने चंद्रावर आपले रोव्हर पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु मोहीम अंशतः यशस्वी झाली. अशा परिस्थितीत आता इस्रोला यश मिळाले आहे, तर भारतीय क्रिकेट संघही यशस्वी होईल, असे मुंबई इंडियन्सला विश्वास आहे.
टीम इंडियाने २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केली आणि ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थान पटकावले, परंतु मँचेस्टरमध्ये उपांत्य फेरीत भारताला किवीजविरुद्ध २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्माने २०२१च्या उत्तरार्धात वन डे मध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि २०२३चा विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून पहिली आयसीसी स्पर्धा आहे.
एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हापासून भारताच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ २०१३ पासून सुरू झाला आहे आणि तो अजूनही सुरूच आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली, भारताने गेल्या वर्षी (इंग्लंड विरुद्ध) टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि जून २०२३ मध्ये (ऑस्ट्रेलिया विरुद्ध) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची विजेतेपदाची लढत गमावली. दोन्हीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ भारतीय संघ संपवणार असे सर्व चाहत्यांना वाटत आहे.
या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतीय भूमीवर होणार आहे. यजमान असल्याने भारत विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला फलंदाज के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे भारतीय वन डे संघ आणखी मजबूत झाला आहे. दोघांचा आशिया चषक संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात, प्रीमियर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील आयर्लंडविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान ११ महिन्यांच्या अनुपस्थितीनंतर पुनरागमन केले, जिथे त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले.