India vs New Zealand, ICC World Cup 2023: वर्ल्ड कप २०२३च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध किवींचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. याच न्यूझीलंडने २०१९च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून चॅम्पियन होण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. टीम इंडियाला पराभवासह धोनीच्या त्या अश्रूंचाही बदला घ्यायचा आहे. न्यूझीलंडनेही आपला नियमित कर्णधार केन विल्यमसनही संघात परतला आहे.
२०१९च्या विश्वचषकाचा बदला घेण्याची टीम इंडियाला संधी
२०१९च्या विश्वचषकाचे दृश्य पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांसमोर येऊ शकते. २०१९च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला होता. त्यानंतर किवी संघाने विराट कोहलीच्या संघाचा पराभव केला होता. यावेळी रोहित शर्माला विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीचा बदला घेण्याची संधी असेल. धोनीचा तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला होता. टीम इंडियाला बदला घेण्याची सुवर्ण संधी असेल.
मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाचा विक्रम काही विशेष चांगला नाही. यावेळी टीम इंडियाने आठव्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. भारतीय संघाला शेवटच्या सातपैकी केवळ तीन वेळा उपांत्य फेरीचा टप्पा पार करता आला आहे. चार वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भारत उपांत्य फेरीत कधी पोहोचला आणि त्याचा सामना कोणाकोणाशी झाला?
या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाने १९८३, १९८७, १९९६, २००३, २०११, २०१५ वर्ल्डकपमध्येही सेमीफायनल गाठली आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करून विश्वचषक जिंकला. यानंतर १९८७च्या विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना झाला. त्यावेळी कपिल देवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला ३५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
१९९६च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंकेशी झाला होता. तेव्हा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता. मात्र, कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी गोंधळ घातला, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आणि श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. यानंतर २००३च्या विश्वचषकात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उपांत्य फेरीत केनियाचा ९१ धावांनी पराभव केला होता. मात्र, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पराभव केला. त्याचवेळी, २०११च्या विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत सामना पाकिस्तानशी झाला होता. एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २९ धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता.
२०१५ मध्ये लीग फेरीत अव्वल स्थान पटकावले, पण उपांत्य फेरीत पराभूत झाले
२०१५ मध्येही संघांची गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. भारतीय संघाने आपल्या गटात (ब) अव्वल स्थान पटकावले होते. त्यांनी सहापैकी सर्व सहा सामने जिंकले होते. यानंतर उपांत्यपूर्व फेरीतही भारतीय संघाने बांगलादेशचा १०९ धावांनी पराभव केला. मात्र, उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला आणि धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा सामना ९५ धावांनी हरला. २०१९चा विश्वचषक राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये खेळला गेला, जिथे सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते.
२०१९च्या विश्वचषकातही टीम इंडिया उत्कृष्ट होती. त्यांनी नऊपैकी सात सामने जिंकले आणि एक सामना गमावला होता. एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतीय संघ १५ गुणांसह अव्वल स्थानावर होता. मात्र उपांत्य फेरीत कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणजेच अव्वल स्थानावर असूनही गेल्या दोन विश्वचषकांमध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ही भीती भारतीय चाहत्यांच्या मनात अजूनही असेल.
२० वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव केला
यंदाच्या विश्वचषकात भारताने साखळी फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाने २० वर्षांनंतर विश्वचषकात किवींवर विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करण्यात भारताला यश आले तर २०१९ मधील पराभवाचा बदलाही पूर्ण होईल. मात्र, गेल्या सात उपांत्य फेरीपैकी भारताने भारतीय भूमीवर तीन सामने खेळले आहेत.
१९८७ आणि १९९६ मध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर २०११ मध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती. यावेळी भारतीय संघाला न्यूझीलंडला हरवून आणि नंतर अंतिम फेरीत विजय मिळवून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकायचा आहे. रोहित शर्मा १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळही संपवू इच्छितो. भारताने शेवटच्या वेळी २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.