Mohammad Shami Jersey Out of Stock against SA Match in Kolkata Markets: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील पुढील सामन्यासाठी टीम इंडिया कोलकाता येथे पोहोचली असून, रविवारी ईडन गार्डनवर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. कोलकातामध्ये टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची प्रचंड क्रेझ आहे. रविवारी ईडन गार्डन हाऊसफुल्ल होणार आहे आणि याचा अंदाज यावरून लावता येईल की भारतीय संघाच्या जर्सी बाजारात खूप वेगाने विकल्या जात आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जर्सीला मागणी इतकी वाढली आहे की अनेक दुकानांमध्ये त्याचा साठा संपला आहे.
आशियातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स मार्केटमध्ये शमीचे वर्चस्व –
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, मोहम्मद शमीच्या सर्व जर्सी ईडन गार्डनच्या आसपास विकल्या गेल्या आहेत. मोहम्मद शमीची जर्सी आशियातील सर्वात मोठ्या क्रीडा साहित्याच्या बाजारपेठेची ही स्थिती आहे. स्थानिक क्रिकेट चाहत्यांमध्ये शमीबद्दलची क्रेझही जास्त आहे. कारण त्याने बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे आणि सध्या तो वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शमीने गेल्या ३ सामन्यात दोनदा ५ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्या झाला भावुक; म्हणाला, “हे पचवायला खूप…”
कोलकात्यात शमी आणि धोनीचे आवडते दुकान –
या मार्केटमधील पॅलेस स्पोर्ट्स नावाच्या दुकानाच्या मालकाने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, येथील प्रत्येक खेळाडूने मैदानातून नाही तर या बाजारातून आपला प्रवास सुरू केला आहे. १९६५ मध्ये स्थापन झालेल्या पॅलेस स्पोर्ट्स शॉपचे मालक रहमान अली सांगतात की, फाळणीनंतर त्यांच्या आजोबांसारखे अनेक लोक पूर्व पाकिस्तानातून (बांगलादेश) भारतात आले. रहमान अली सांगतात की एमएस धोनीने त्याच्या दुकानातून हातमोजे विकत घेतले होते. याशिवाय शमीभाईही त्यांच्या दुकानात अनेकदा आले आहेत. मात्र, आता तो येत नाही.
रोहित-विराटच्या जर्सीपेक्षा शमीच्या जर्सीला मागणी जास्त –
रहमान अली पुढे सांगतात की, आमच्या दुकानातील मोहम्मद शमीच्या जर्सीचा साठा संपला आहे. तो म्हणाला की, सहसा लोक रोहित आणि विराटच्या जास्त जर्सी ठेवतात, पण शमी एवढा प्रसिद्ध होईल आणि त्याची जर्सी संपेल हे आम्हाला माहीत नव्हते. मात्र, काळजी करण्याची गरज नाही, रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी आमच्याकडे आणखी जर्सी असतील.
हेही वाचा – मोहम्मद शमी: हिंसाचाराचा आरोप, पत्नीविरुद्ध कायदेशीर लढा, अपघात आणि समस्यांचे गर्ते
टीम इंडियाच्या जर्सीचा वाढला व्यवसाय –
रहमान अली पुढे म्हणाले की, आमच्या दुकानात जर्सीची किंमत सुमारे ४५० रुपये आहे, जी सामान्य दिवसात २५० ते ३०० रुपयांपर्यंत असते. अलीने सांगितले की, कोविड महामारीदरम्यान आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता, परंतु विश्वचषकादरम्यान आमचे नुकसान भरून काढले जाईल. आम्ही उद्याच्या सामन्याची वाट पाहत आहोत. सामन्याच्या दिवशी आमची कमाई अनेक पटींनी वाढेल, विश्वचषकादरम्यान आम्ही दररोज २००-३०० जर्सी विकतो.