२७ व्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत भारताची सलामीची लढत अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वीच हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. राष्ट्रकुल, आशियाई खेळ यांसारख्या महत्वाच्या स्पर्धांआधी प्रयोग करण्यासाठी या संघात अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन तरुण खेळाडूंना जागा देण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा – अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, सरदार सिंहचं संघात पुनरागमन

सरदार सिंहनेही अझलन शहा चषक स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय संघात पुनरागमन केलं असून, भारतीय संघाची जबाबदारीही त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. सरदार सिंहने आतापर्यंत २९२ सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे आपल्या तरुण साथीदारांच्या मदतीने यंदाच्या स्पर्धेत आपण चांगली कामगिरी करु असा आत्मविश्वास सरदार सिंहने व्यक्त केलाय.

अवश्य वाचा – मी संपलेलो नाही, माझ्यातला ‘सरदार’ अजुनही जागा – सरदार सिंह

सध्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ सहाव्या स्थानावर तर अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे तरुण खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघासमोर पहिल्याच फेरीत मोठं आव्हान असणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर भारत पुढील स्पर्धांसाठी आपली रणनिती आखणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजय अथवा बरोबरी साधल्यास ही मोठी गोष्ट मानली जाईल. त्यामुळे मनदीप मोर, सुमीत कुमार, शैलेंद्र लाक्रा यांसारख्या तरुण खेळाडूंच्या कामगिरीवर प्रशिक्षक जोर्द मरीन यांची करडी नजर असणार आहे.

भारतीय हॉकी संघाचं साखळी सामन्यांचं वेळापत्रक –

पहिला सामना – भारत विरुद्ध अर्जेंटीना – ३ मार्च

दुसरा सामना – भारत विरुद्ध इंग्लंड – ४ मार्च

तिसरा सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ६ मार्च

चौथा सामना – भारत विरुद्ध आयर्लंड – ९ मार्च

Story img Loader